दक्षिण आफ्रिका संघ कोलकात्यात दाखल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA Test series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी विश्व कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका शुक्रवारी ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या कसोटीसाठी येथे पोहोचला आहे. बंगळुरूमध्ये भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा देखील संघात सामील झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पहिली तुकडी येथे पोहोचली, ज्यात मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड, वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि माकों जॅन्सन आणि पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळलेले खेळाडू यांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे स्थानिक व्यवस्थापक म्हणाले, बावुमा आज सकाळी बंगळुरूहून आणखी एक खेळाडू आणि काही अधिकाऱ्यांसह येथे पोहोचले. मुख्य प्रशिक्षकासह संघातील बहुतेक सदस्य रविवारी पोहोचले. दोन्ही संघ मंगळवारी सराव सुरू करतील अशी अपेक्षा आहे. स्नायूंच्या ताणामुळे बावुमा पाकिस्तानमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकला. त्याने सामन्याच्या सरावासाठी भारत अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भाग घेतला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमा पहिल्या डावात शून्यावर बाद झाला, परंतु दुसऱ्या डावात त्याने १०१ चेंडूत ५९ धावा केल्या, ज्यामुळे रविवारी संपलेल्या सामन्यात त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात मदत झाली. मध्यक्रमातील फलंदाज झुबेर हमजा देखील बंगळुरूमध्ये दोन्ही सामने खेळल्यानंतर मुख्य संघात सामील झाला.
हेही वाचा : IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारतात शेवटची कसोटी मालिका कधी जिंकली होती? आश्चर्यकारक आकडेवारी
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून परतणारा संघ रविवारी रात्री उशिरा पोहोचला. यामध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. उर्वरित खेळाडू वेगवेगळ्या बॅचमध्ये येथे येण्याची अपेक्षा आहे. भारताने गिलच्या नेतृत्वाखाली २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मोहिमेची सुरुवात केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
१४ पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिकेचा संघ सज्ज असल्याचे त्यांच्या खेळाडूंनी रविवारीच दाखवून दिले. कसोटी गोलंदाज आणि फलंदाजांचा समावेश असणाऱ्या भारतीय’ अ’ संघाने आफ्रिकेच्या संघाने नमविले. या सामन्यात आफ्रिकन संघ फिरकीविरुद्ध अगदी सहज खेळला, त्यामुळे या कसोटी मालिकेत कर्णधार गिलची खऱ्या अर्थाने कसोटी आहे. गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने घरच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा २-० असा धुव्वा उडवला. ही भारताची वर्षातील शेवटची कसोटी मालिका असेल. यानतर, भारत पुढील वर्षी जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापर्यंत कोणताही रेड-बॉल सामना खेळणार नाही.
हेही वाचा : राशिद खान उभा राहिला पत्नीसाठी…सोशल मिडियावरील पोस्ट व्हायरल! नक्की प्रकरण काय वाचा सविस्तर






