भारत वि वेस्ट इंडिज(फोटो-सोशल मीडिया)
IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताने ३८७ धावांची मोठी आघाडी घेऊन सामन्यावर चांगलीच पकड जमवली आहे. रवींद्र जडेजाने घेतलेल्या ३ विकेट्समुळे वेस्ट इंडिज संघ चांगलाच अडचणीत आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने ४३ षटकांत ४ गडी गमावून १४० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज अजूनही ३७८ धावांनी पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजकडून टेविन इमलाच १४ धावा आणि शाई होप ३१ धावांवर नाबाद आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाने १४ षटकांत ३७ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले आहेत, तर कुलदीपने एक बळी टिपला आहे.
हेही वाचा : IND vs WI : शुभमन गिलचा धमाका सुरूच! वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवून डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम केला उद्ध्वस्त
रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजवर जोरदार हल्ला चढवला. या धक्क्यातून वेस्ट इंडिजला सावरता आले नाही. संघ दबावात आला. वेस्ट इंडिजच्या संघाने चार गडी गमावले आहेत. रोस्टन चेसची चौथी विकेट गमावली, जो धावा काढण्यात अपयशी ठरला. त्याला भोपळाही न फोडता जाडेजाने माघारी पाठवले. त्याआधी, वेस्ट इंडिजने जॉन कॅम्पबेल (१०), तेजनारायण चंद्रपॉल (३४) आणि अॅलेक अथानासे (४१) यांच्या महत्वाच्या विकेट गमावल्या. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर भारताने पहिल्या डावात ५१८ धावांवर आपला डाव घोषित केला.
भारताने दुसऱ्या दिवशी ३१८ धावांवर आपला डाव सुरू केला. भारतीय फलदाजांनी दीड सत्रात २०० धावा जोडल्यानंतर डाव घोषित केला केला. पहिल्या दिवशी १७३ धावांवर नाबाद राहिलेला यशस्वी जयस्वालचे द्विशतक थोड्याने हुकले आणि तो १७५ धावांवर धावबाद झाला. तथापि, कर्णधार शुभमन गिलने आपली लय कायम राखत एक शानदार शतक झळकावले. नितीश कुमार रेड्डीने ४३ आणि ध्रुव जुरेल यांनी ४४ धावा केल्या. जुरेलची विकेट पडताच गिलने ५१८ धावांवर डाव घोषित केला. शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद राहिला.
हेही वाचा : IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम
भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्या दिवशी १७३ धावांवर नाबाद राहिला होता. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शॉट्स मारले आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने १७३ पासून पुढे खेळताना फक्त २ धावांची भर टाकली. त्याने २५८ चेंडूंचा सामना करत १७५ धावा केल्या. त्याने २२ चौकार मारले. पण तो द्विशतकाकडे वाटचाल करत असतानाच एका चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला आणि त्याचा डाव १७५ धावांवर आटोपला.