भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – महिला कसोटी सामना : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाची आघाडी 46 धावांची झाली आहे. याआधी टीम इंडियाचा पहिला डाव 406 धावांवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाला 187 धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या दिवशी अॅनाबेल सदरलँड आणि अॅशले गार्डनर नाबाद माघारी परतले.
अॅनाबेल सदरलँड १२ धावांवर नाबाद आहे. तर, अॅश्ले गार्डनर ७ धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 12 धावांची भागीदारी झाली. ताहिला मॅकग्राने सर्वाधिक धावा केल्या, ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. बेथ मुनी 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. फोबी लिचफिल्डने 18 धावा केल्या. यानंतर एलिस पेरीने ४५ धावांची चांगली खेळी केली. ताहिला मॅकग्राने ७३ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या चेंडूवर अॅलिसा हीली 32 धावा करून बाद झाली. सध्या ऑस्ट्रेलियाच्या आशा अॅनाबेल सदरलँड आणि अॅशले गार्डनर यांच्यावर टिकून आहेत. त्याचवेळी, स्नेह राणा आणि हरमनप्रीत कौर यांनी आतापर्यंत भारतासाठी 2-2 यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीला रिचा घोषने धावबाद केले.
टीम इंडियाने पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या
भारताचा पहिला डाव 406 धावांवर आटोपला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. या अष्टपैलू खेळाडूने 78 धावांचे योगदान दिले. याशिवाय स्मृती मानधना, रिचा घोष आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. पूजा वस्त्राकरने 47 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय किम गर्थ आणि अॅनाबेल सदरलँड यांना 2-2 यश मिळाले. जेस जॉन्सनने शेफाली वर्माला बाद केले.