रोहित शर्मा, झहीर खान आणि शार्दुल ठाकूर(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४३ सामने खेळवण्यात आले आहेत. ४५ वा सामना हा मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित शर्माने शार्दुल ठाकूरची खरडपट्टी काढल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शार्दुल ठाकूर हा या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे.
प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी स्पर्धेत असणाऱ्या दोन्ही संघांमध्ये हाय-व्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे. या सामान्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अनुभवी आणि माजी कर्णधार रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रात हजर होता आणि त्याचवेळी त्याने लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सरावासाठी उशिरा येत असल्याचे दिसून आल्यावर रोहितने त्याचा क्लास घेतला.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, रोहित शर्मा असे बोलताना ऐकू येतो आहे की, “काय हिरो, आता येत आहे का, हा घरचा संघ आहे का?” त्यानंतर ठाकूर हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान् व्हायरल होत आहे.
When बोरीवली meets पालघर 😂💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/pQQMFplNHl
— Mumbai Indians (@mipaltan) April 25, 2025
मागील वेळी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौने एकाना स्टेडियमवर १२ धावांनी विजय प्राप्त केला होता. उद्या होणाऱ्या(२७ एप्रिल) एलएसजीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ घरच्या मैदानावर आपली जादू दाखवून विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
मुंबईचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माची आयपीएल २०२५ मधील सुरुवात खूपच खराब झाली होती. तो पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नव्हता. सलग पाच सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर, रोहित आता आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने २० एप्रिल रोजी सीएसकेविरुद्ध ४५ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या होत्या. तसेच २३ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये एमआय आणि एसआरएच या सामन्यात देखील त्याने ४६ चेंडूत ७० धावा करून हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाला ७ विकेटने विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला होता. २७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ सध्या या सामन्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत.