टॉम मूडी(फोटो-सोशल मीडिया)
Tom Moody becomes LSG’s new Global Director: लखनौ सुपर जायंट्सकडून माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू टॉम मूडी यांना त्यांचे ग्लोबल डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन भूमिकेत, मूडी केवळ लखनौमधील आयपीएल संघाचीच नव्हे तर एसए २० लीगमधील डर्बन सुपर जायंट्स आणि इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमधील मँचेस्टर फ्रँचायझीची क्रिकेट रणनीती आणि कामकाज पाहणार आहे. ते संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि अलीकडेच नियुक्त झालेले धोरणात्मक सल्लागार केन विल्यमसन यांच्याशी जवळून काम करणार आहेत.
टॉम मूडी आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये यश मिळवलेले अनुभवी व्यक्ति आहेत. त्यांनी यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चे मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील काम केले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने २०१६ मध्ये आयपीएलचे जेतेपद आपल्या नावे केले होते. मूडी यांनी अलीकडेच इंग्लंडच्या ओव्हल इनव्हिन्सिबल्सला “द हंड्रेड” मध्ये सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी ILT20 लीगमध्ये डेझर्ट व्हायपर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे. २०२३ आणि २०२५ दोन्हीमध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. एका वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स आणि इंग्लंडच्या सरे काउंटीचे मालक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड देखील मूडीला त्यांच्या सेटअपमध्ये कायम ठेवू इच्छित असल्याची माहिती होती, परंतु मूडी यांनी एलएसजीची ऑफर स्वीकारली आहे.
आरपी संजीव गोएंका ग्रुपने अद्याप मूडींच्या नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, सूत्रांनी सांगितले की ते लवकरच संघात सामील होणार आहेत. मूडी माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानची जागा घेणार आहे. जो आयपीएल २०२५ मध्ये संघाचे क्रिकेट ऑपरेशन्स प्रमुख होता. झहीरला दोन वर्षांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती परंतु फक्त एका हंगामानंतर त्याने संघाचा निरोप घेतला आहे.
हेही वाचा : अमेरिकेच्या मिलिंद कुमारचा विराट कोहलीला धोबीपछाड! एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला ‘हा’ कारनामा
टॉम मूडी यांची क्रिकेट कारकीर्द गौरवशाली राहिलेली आहे. ते १९८७ आणि १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघांचा भाग देखील होते. नंतर त्यांनी २००५ ते २००७ पर्यंत श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली, श्रीलंकेने २००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. आता, एलएसजीला आशा आहे की मूडी त्यांच्या अनुभवाचा वापर करून आयपीएलमध्ये संघाला नवीन उंचीवर पोहचवतील.






