राज्य सरकारकडून स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा गौरव होणार(फोटो-सोशल मीडिया)
भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिले महिला एकदिवसीय विश्वचषक जेतेपद जिंकले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून भारतीय महिला संघाचे अभिनंदन करण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सांगितले की “आज मंत्रिमंडळाने आयसीसी महिला विश्वचषकामध्ये विश्वचषक जिंकून भारतीय महिला चमूने जी देदीप्यमान कामगिरी केली आहे. त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या महराष्ट्रातल्या तीन खेळाडू, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांच्या सत्कार राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल. तसेच आपल्या धोरणानुसार रोख रक्कम देखील देण्यात येईल.”
राधा यादव, जेमीमा आणि स्मृति यांचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार असला तरी त्यांना किती रोख रक्कम देण्यात येईल याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारतीय संघातील राधा यादव मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहे पण तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबई येथून केली आणि सध्या ती गुजरातसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. तसेच भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधनाचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाला, परंतु तिचे बालपण आणि शिक्षण महाराष्ट्रातील सांगली येथे गेले. ती भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळते आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करते. समीफायनलमध्ये शतक झळकवून भारताला विजयी करणारी जेमीमा रॉड्रिग्ज ही एक भारतीय क्रिकेटपटू आहे जिचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. ती मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील क्रिकेट संघांसाठी खेळली आहे.
रविवारी, २ नोव्हेंबर रोजी, नवी मुंबई येथे आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या भारतीय संघाने ७ बाद २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, कर्णधार लॉरा वोल्वार्ड (१०१) च्या शतकानंतर देखील दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत केवळ २४६ धावाच करू शकला. परिणामी भारतीय संघाने विजेतपद आपल्या नवे केले.






