सावळजमध्ये उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा(फोटो- टीम नवराष्ट्र)
सावळज जि.प. गटात राष्ट्रवादी (श. प.)चा जोर
सर्व गावांतून उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा
प्रचाराने घेतला चांगलाच वेग
तासगाव: तासगाव तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, वायफळे, वडगाव, सावळज, जरंडी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, दहिवडी, अंजनी, नागेवाडी, यमगरवाडी आणि लोकरेवाडी या सर्व गावांत पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना मोठा व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे संपूर्ण गटातील वातावरण राष्ट्रवादी (श. प.)च्या बाजूने झुकताना दिसत आहे.
सावळज जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ॲड. विजय धेंडे निवडणूक रिंगणात असून, सावळज पंचायत समिती गणातून प्रकाश पाटील तर वायफळे पंचायत समिती गणातून पंकज उर्फ जितेंद्र झांबरे-पाटील मतदारांसमोर आहेत. सुशिक्षित, अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेच्या या उमेदवारांबाबत संपूर्ण गटातील मतदारांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘काम करणारे आणि विश्वासार्ह चेहरे’ अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
आमदार रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक संघटितपणे प्रचारात उतरले आहेत. उमेदवार सकाळपासून पायाला भिंगरी लावून घराघरांत पोहोचत असून, थेट वैयक्तिक भेटी घेत मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत. भाषणांपेक्षा थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण आणि विकासकामांची स्पष्ट मांडणी यामुळे प्रचाराला प्रभावी धार मिळाली आहे.
प्रचाराच्या दरम्यान स्वर्गीय आर. आर. आबा पाटील व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येत असून, ‘आबा पाटलांचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचा’ निर्धार कार्यकर्त्यांच्या जोशातून प्रकर्षाने जाणवतो. एकूणच संघटित प्रचार, स्थानिक नेतृत्वाची मजबूत पकड आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे सावळज जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी अधिक भक्कम होत असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.






