Nicholas Pooran (Photo Credit- X)
Nicholas Pooran Captain: कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ (CPL 2025) चा हंगाम सुरू होण्याआधी, स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ट्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) याची संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी, कॅरिबियन क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) संघाचे नेतृत्व करत होता. याशिवाय, वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
A new sun rises over TKR as 𝐂𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧 𝐏𝐨𝐨𝐫𝐚𝐧 leads us into the future. 👑
Kieron Pollard | Nicholas Pooran | #WeAreTKR | #TrinbagoKnightRiders pic.twitter.com/qrH1VLXh8r
— Trinbago Knight Riders (@TKRiders) August 14, 2025
निकोलस पूरन यांने गेल्या ६ हंगामात ट्रिनबागो नाईट रायडर्सचे सतत नेतृत्व करणाऱ्या किरॉन पोलार्डची जागा घेतली आहे. पोलार्डच्या नेतृत्वाखाली हा संघ २०२० मध्ये सीपीएल चॅम्पियनही बनला. दुसरीकडे, ड्वेन ब्राव्हो यांनी फिल सिमन्सच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. सिमन्स आता बांगलादेश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.
ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर निकोलस पूरनने आपला आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “या फ्रँचायझीचे नेतृत्व करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ही एक मोठी संधी आहे आणि मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, माझ्या संघात पोलार्डसोबतच सुनील नारायण आणि आंद्रे रसेल सारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव मैदानावर मला योग्य निर्णय घेण्यासाठी खूप मदत करेल.” निकोलस पूरनने वयाच्या १७ व्या वर्षी सीपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि तेव्हापासून तो या लीगचा एक महत्त्वाचा भाग आहे.
निकोलस पूरन याची गणना सीपीएलमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते.
त्याने आतापर्यंत ११४ सामन्यांमध्ये २४४७ धावा केल्या आहेत.
त्याचा स्ट्राइक रेट १५२.१७ असून, त्याने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत.
ट्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) त्यांचा सीपीएल २०२५ मधील पहिला सामना १७ ऑगस्ट रोजी सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध खेळणार आहे.