लुंगी एनगिडी(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने पाच विकेट घेऊन इतिहास रचला आहे. लुंगी एनगिडीच्या माऱ्याने ऑस्ट्रेलियाचा संघ १९३ धावांत गडगडला आहे. एनगिडीच्या कामगिरीने संघाला ८४ धावांनी विजय मिळवून दिला आहे. यासह, लुंगी एनगिडीने एका खास यादीत स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकापेक्षा जास्त एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एनगिडीने प्रवेश केला आहे.
मॅकेच्या ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २७७ धावांचे आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त १९३ धावांतच सर्वबाद झाला. लुंगी एनगिडीने सर्वाधिक ४२ धावांत ५ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेण्याची ही एनगिडीची दुसरी वेळ वेळ ठरली आहे.
एन्गिडी कर्टली अॅम्ब्रोससारख्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. कर्टली अॅम्ब्रोसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ३ वेळा ५ बळी घेण्याची किमया केली आहे. शेन बाँडनेही देखील ही कामगिरी तीन वेळा करून दाखवली आहे. त्यानंतर ट्रेंट बोल्टने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ वेळा ५ बळी टिपण्याची कामगिरी केली आहे.
लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये १६.९६ च्या सरासरीने २६ बळी घेतले असून यादरम्यान, त्याने फक्त ५ च्या इकॉनॉमी रेटने धावा मोजल्या आहेत. लुंगी एनगिडीची ही कामगिरी दाखवून देते की, ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थोडा कमकुवत असल्याचे दिसून आले आहे. हा सलग चौथा एकदिवसीय सामना आहे ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या घरच्या मैदानावर २०० पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने मागील आठ एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका आपल्या खिशात टाकली आहे. यासह, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या १० एकदिवसीय मालिकेपैकी ८ मालिका जिंकल्या आहेत. ज्यामध्ये शेवटच्या पाच एकदिवसीय मालिकेचा समावेश आहे.