आयपीएलनंतर (IPL) भारतातील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) स्पर्धेला ७ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. सध्या प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सुरु असून तमिळ थलैवास विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लीगमधील सर्वात मोठा स्टार पवन सेहरावतला दुखापत झाली असून त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले.
तमिळ थलैवास विरुद्ध गुजरात जायंट्स ( Tamil Thalaivas vs Gujarat Giants) यांच्यात सामना सुरु होता, थलायवाससाठी मॅटवर फक्त दोनच खेळाडू होते. यादरम्यान पवनने सहकारी बचावपटूला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा पाय वळल्यामुळे तो जखमी झाला. पवनच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो वेदनेने ओरडत होता. फिजिओने तिथे येऊन त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. वेदनेने ओरडणाऱ्या पवनला पायही हलवता येत नव्हता. यानंतर त्याला मैदानाबाहेर काढावे लागले. तो चालण्याच्या स्थितीतही नव्हता आणि त्यामुळेच त्याला स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले.
प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील पवन हा सर्वात महागडा खेळाडू आहे. तमिळ थलैवासने त्याला यंदाच्या मोसमाच्या लिलावात २.२६ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पहिल्याच सामन्यात त्याची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. पवन हा तमिळ थलैवास संघाचा कर्णधारही होता. पवन सेहरावत या दुखापतीमधून कधी पर्यंत सावरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.