NZ vs UAE, T-20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ११ व्या सामन्यात न्यूझीलंड आणि युएई आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने स्पर्धेतील आपला सर्वात मोठा विजय मिळवला. न्यूझीलंड संघाने यूएईचा १० विकेट्सने दणदणीत पराभव केला आणि १५.२ षटकांतच सामना आपल्या खिशात टाकला. या सामन्यात टिम सेफर्टने षटकार मारून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह न्यूझीलंडने सुपर-८ साठी आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानच्या यु-टर्नवर वसीम जाफरने उडवली खिल्ली! आतापर्यत कोणीही पाकचा असा अपमान केला नाही…
युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. १२ धावांवर आर्यंश शर्माची विकेट गमवावी लागली. आर्यंश ८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर कर्णधार मोहम्मद वसीम आणि अलिशान सराफू यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ४७ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांसह ५५ धावा काढल्यानंतर सराफू माघारी गेला.
यानंतर कर्णधार वसीम आणि मयंक कुमार यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली. मयंकने १२ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह २१ धावा काढल्यावर तो बाद झाला. वसीम शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने ४५ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ६६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. हर्षित कौशिक २ धावा काढून बाद झाला आणि शोएब खान ७ धावा काढल्या. यूएईने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १७३ धावा उभ्या केल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मिशेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
१७४ धावांचा पाठलाग करताना(टी-२० विश्वचषक २०२६ ), न्यूझीलंडचे सलामीवीर टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी यूएईच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. त्यांनी मैदानावर सर्वत्र फटकेबाजी केली. ज्यामुळे यूएईच्या गोलंदाजांना अडचणीत आणता आले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी केली आणि संघाचा आरामदायी विजय निश्चित केला.
डाव सुरू करताना, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. टिम सेफर्टने केवळ २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने १२ चौकार आणि तीन षटकार मारले. फिन ऍलन यांनी ५० चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकार मारून नाबाद ८४ धावा फटकावल्या. तसेच टिम सेफर्टने ४२ चेंडूत ८९ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. यूएईकडून कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यश आले नाही.






