प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक (फोटो- सोशल मिडिया)
मुलींच्या एकेरीत ऋषिका नंदी, गाथा सूर्यवंशी आणि इशिता नेगी यांनी उपांत्य फेरी गाठली, तर थायलंडच्या पट्टनून थियानापरपोर्नचोकनेही आगेकूच केली. पी.ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित देव रुपारेलियाने वीरेन सेठचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात देवने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सामन्यावर नियंत्रण ठेवले.सातव्या मानांकित प्रणव मंजुनाथने लक्ष्मी स्वेतन तमातमालाचे आव्हान २१-१४, २१-१७ असे परतवून लावले. अवघ्या २५ मिनिटांत संपलेल्या या सामन्यात प्रणवने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
सोळाव्या मानांकित निश्चल चंदला मात्र शौर्य अगरवालकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. तब्बल १ तास १२ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यात निश्चलने २२-२०, १५-२१, २१-१२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.दुसऱ्या मानांकित जगशेर सिंग खंगुर्राने काल अव्वल मानांकित खेळाडूला पराभूत करून धक्कादायक निकाल नोंदविणाऱ्या अर्जुन रेड्डी अलुगुवेल्लीचा २१-११, २१-१४ असा पराभव केला. ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात जगशेरने दोन्ही गेममध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
मुलींच्या एकेरीत बिगर मानांकित ऋषिका नंदीने तिसऱ्या मानांकित दिशा संतोषचा २१-१६, २१-१८ असा पराभव करत स्पर्धेतील सनसनाटी निकाल नोंदवला. ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात ऋषिकाने संयमी तसेच आक्रमक खेळाचा सुरेख मेळ साधत मानांकित प्रतिस्पर्ध्यावर मात केली.थायलंडच्या पट्टनून थियानापरपोर्नचोकने भारताच्या विजया लक्ष्मी बोड्डूचे आव्हान २१-१७, २१-१७ असे संपुष्टात आणले. ३० मिनिटे चाललेल्या सामन्यात थायलंडच्या खेळाडूने दोन्ही गेममध्ये सातत्य राखत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय
गाथा सूर्यवंशीने अवनी गोविंदचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. ३४ मिनिटांच्या या सामन्यात गाथाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत दोन्ही गेमवर पकड ठेवली आणि उपांत्य फेरी गाठली.दुसऱ्या मानांकित इशिता नेगीने धिष्ठा सिंघा गोपीनाथचा २२-२०, २१-१४ असा पराभव करत आपले आव्हान कायम राखले. पहिल्या गेममध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीनंतर इशिताने दुसऱ्या गेममध्ये आपल्या खेळाची गती वाढवत सामना जिंकला आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.






