ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धा (फोटो-- सोशल मिडिया)
शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात सुरू झालेल्या या स्पर्धेतील मुलांच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत अर्जुन रेड्डी अलुगुवेल्लीने आठव्या मानांकित आदित्य किरणचा तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात २१-१८, १९-२१, २१-१९ असा पराभव केला. अर्जुनने निर्णायक गेममध्ये संयमी आणि आक्रमक खेळ करत सामना आपल्या नावावर केला.
मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित भारताच्या जगशेर सिंग खंगुर्रा याने नीरज नायर पी. एस. याचा २०-२२, २१-०८, २१-१५ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. वैभव सिंग यानेही वर्णन महंता याच्यावर २१-१०, २०-२२, २१-१९ असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.चौदाव्या मानांकित भारताच्या कार्तिक रूपा सुहास याने भूतानच्या टंडिन सोनम याचा सरळ दोन गेममध्ये २१-०२, २१-०६ असा पराभव केला. नवव्या मानांकित भारताच्या अश्विन लेनिन मुथुराज याने नेपाळच्या सदिप राय याच्यावर २१-१२, २१-१२ असा सहज विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
BWF World Championship मध्ये सोफिया नोबलचा धुव्वा; PV Sindhu चा विजयी धमाका
मुलींच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत अक्षिता मनरल हिने सरयू सूर्यानेनी हिचे आव्हान २१-१३, २१-१७ असे परतवून लावत विजयी सुरुवात केली. केतकी थिटे हिने यवर्णा रेणुश्री श्यामलाराव हिच्यावर २१-१०, २१-१४ असा विजय मिळवला. श्रावणी बिरादार हिनेही प्रभावी खेळ करत लिओनी तायेंजाम हिचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध गटांमध्ये दमदार कामगिरी करत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले.सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत देश-विदेशातील युवा खेळाडू सहभागी झाले असून, पुढील फेऱ्यांमध्ये अधिक रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत.






