प्रो कबड्डीत यु मुम्बाची विजयी आगेकूच कायम, परवेश भैन्सवालने केलेली अव्वल पकड ठरली निर्णायक
नोएडा : प्रो-कबड्डीच्या ११व्या पर्वात अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या बंगळुरु बुल्सने सोमवारी ६२व्या सामन्यात विजयासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. त्यांच्याकडून परदीपने सुपर टेन गाठले, नितीन रावलने हाय फाईव्ह पूर्ण केले. पण, त्यानंतर यु मुम्बाने पूर्णपणे तिसऱ्या चढाईवर केलेल्या नियोजनातून बंगळुरुला बाहेर पडता आले नाही. अखेरच्या मिनिटाला ३६-३६ अशा बरोबरीत बंगळुरुच्या क्षितीजची यु मुम्बाच्या परवेश भैन्सवालने तीन खेळाडूत अव्वल पकड करुन सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यु मुम्बाने अखेरच्या सेकंदाला सुनिल कुमारची पकड झाल्यानंतरही ३८-३७ असा निसटता विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली.
गुणतालिकेत यु मुम्बा दुसऱ्या स्थानावर
लीगमध्ये दोन्ही संघांचा हा ११वा सामना होता. यु मुम्बाने सातवा विजय मिळविला. पण, बंगळुरुला प्रयत्न करुनही विजयाने पाठ दाखवली. हा त्यांना स्पर्धेतील नववा पराभव ठरला. तिसऱ्या चढाईवर झालेल्या या सामन्यात यु मुम्बाने आपले नियोजन अचूक ठेवले. यानंतरही परवेश भैन्सवालचे ३ आणि सुनिल कुमारचे ४ बचावातील गुण निर्णायक ठरले. मनजीतने चढाईत ९ गुणांची कमाई केली. उत्तरार्धात सुशीलने दोन वेळा बंगळुरुवरील लोण रोखण्यात यश मिळवून सहा गुणांची कमाई केली. मात्र, त्याचेही प्रयत्न अपयशी ठरले. यु मुम्बाने या संघर्षपूर्ण विजयाने गुण तालिकरेत दुसरे स्थान मिळविले.
लोण स्वीकारूनही यु मुम्बाचा ३८-३७ असा विजय
उत्तरार्धातही दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईवर खेळण्याचे आपले नियोजन कायम राखले होते. दोन्ही संघांकडून परदीप नरवाल आणि अजित चौहान यांनी चढाईत १० गुणांची कमाई केलेली दिसत असली, तरी आज त्यांच्या चढाईत तो जोश दिसून आला नाही. अजितच्या सहा वेळा पकडी झाल्या, तर परदीप ७ वेळा मोकळ्या हाताने परत आला. सामन्यातील चढाईपटूंचे अपयश हा मोठा चर्चेचा मुद्दा ठरला. बंगळुरुला नितीन रावल आणि सनी यांनी केलेल्या अव्वल पकडींमुळे सामन्यात आव्हान राखता आले होते. अजित चौहान अपयशी ठरत असताना उत्तरार्धात मनजीतच्या एका अव्वल चढाईने यु मुम्बाचे आघाडीचे काम चोख बजावले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा डु ऑर डायच्या कचाट्यात चढाईपटू अडकले. सामना ३४-३४, ३४-३५, ३६-३५ अशा एका गुणाच्या आघाडीवरच निर्णायक क्षणावर आला होता. अखेरच्या मिनिटाला ३६-३६ अशी बरोबरी दिसत असताना परवेश भैन्सवालने क्षितीजची तीन खेळाडूंत पकड करत संघाला अव्वल पकडीचे विजयी दोन गुण मिळवून दिले.
तिसऱ्या चढाईत अडकले चढाईपटू
पूर्वार्धात बंगळुरु बुल्स आणि यु मुम्बा दोन्ही संघांनी अव्वल चढाईपटू असूनही सुरुवातीचा वेळ तिसऱ्या चढाईवरच खेळून काढला. दोन्ही संघांचे चढाईपटू या सुरुवातीच्या काळात डू ऑर डाय चढाईत अडकले. परदीप नरवालने पहिल्याच चढाईला बोनससह मिळविलेले दोन आणि त्यानंतर सातव्या मिनिटाला यु मुम्बाच्या अजित चौहानने केलेली अव्वल चढाई या दोनच चढायांचा यात अपवाद होता. बंगळुरुसाठी मध्यरक्षक प्रतिकने यु मुम्बाच्या अजित चौहानची कोंडी केली होती. तरी देखिल अजितने सहा बोनस गुणांसह या सत्रात आठ गुणांची कमाई केली होती. सुशीलच्या चढायांवर भर देत बंगळुरुने पहिल्या सत्रात परदीपचा सावधपणे वापर केला. याचा त्यांना फायदा झाला. यु मुम्बावर लोण देत परदीपने बंगळुरुची पिछाडी १५-१४ अशी भरुन काढली होती. त्यानंतर परदीपने गुण आणले. पुन्हा एकदा यु मुम्बाने तिसऱ्या चढाईत खेळ करत मध्यंतराला २१-२० अशी आघाडी मिळविण्यात यश मिळविले.
हेही वाचा : ICC Champions Trophy : पीसीबीने केलं स्पष्ट, चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलने होणार नाही!