फोटो सौजन्य - ProKabaddi सोशल मीडिया
यु मुम्बा विरुद्ध हरियाणा स्टिलर्स : काल यु मुम्बाला विरुद्ध हरियाणा स्टिलर्स या दोन संघामध्ये सामना झाला. हरियाना स्टिलर्सने सर्वोत्तम सांघिक आणि नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करताना प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वात रविवारी यु मुम्बाचा ४७-३० पराभव केला. या विजयाने ८४ गुणांची कमाई करुन थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. गुणतालिकेत कुणीही गाठू शकणार नाही असे भक्कम अव्वल स्थान पटकावणारा हरियाणा स्टिलर्स संघ आता २७ डिसेंबरला पहिला उपांत्य सामना खेळणार आहे.
शिवम पठारेच्या (१४ गुण) वेगवान आणि खोलवर चढाया, त्याला याच आघाडीवर विनय ताटेकडून (६ गुण) मिळालेली सुरेख साथ हरियाणा स्टिलर्ससाठी महत्वाची ठरली. अर्थात, संजय (४ गुण) राहुल (५ गुण) आणि महंमद रेझा (६ गुण) शाडलुईचा बचाव विसरता येणार नाही. त्यांनी यु मुम्बाच्या चढाईपटूंना निष्प्रभ केले. या सामन्यात सातपेक्षा कमी गुणांनी पराभव स्विकारण्यात त्यांना अपयश आल्यामुळे बाद फेरीच्या उंबरठ्यावर असलेल्या यु मुम्बाला अखेरच्या सामन्यावर अवलंबून रहावे लागेल. यंदाच्या हंगामातील बाद फेरीचे संघ मिळाले असले, तरी अखेरचा सहावा संघ लीगच्या अखेरच्या साखळी सामन्यात मिळेल. हा सामना यु मुम्बा आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात २४ डिसेंबरला होईल.
शिवम पठारेच्या यशस्वी चढाया आणि बचावफळीच्या भक्कम कामगिरीच्या जोरावर हरियाणा स्टिलर्सने पूर्वार्धात निर्विवाद वर्चस्व राखताना यु मुम्बाला दडपणाखाली ठेवले. यु मुम्बाकडून रोहित राघव आणि मनजितच्या देखिल चढाया चांगल्या होत होत्या. बचावफळीत कर्णधार सुनिल कुमारची अचूक साथही मिळत होती. मात्र, स्विकाराव्या लागलेल्या दोन लोणमुळे यु मुम्बाला सामन्यात मंध्यतराला १४-२६ असे पिछाडीवरच रहावे लागले.
धाकड़ छोरों ने यू मुंबा को हराकर सेमीफाइनल में बनाई जगह 🔥💙 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #UMumba pic.twitter.com/JjG3mmi6Zc
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2024
उत्तरार्धात हरियाणाने वेगापेक्षा संथ खेळ करणे पसंत केले. बाद फेरी प्रवेशासाठी उंबरठ्यावर असलेल्या यु मुम्बांच्या खेळाडूंना त्यांना गुणांसाठी प्रयत्न करायला लावले. या वेगळ्या नियोजनात हरियानाच्या राहुल आणि शाडलुईच्या बचावाने यु मुम्बाच्या चढाईपटूंना निष्प्रभ करत हाय फाईव्ह पूर्ण केले. यु मुम्बाला चढाईत अजित चौहानकडून आलेले अपयश चांगलेच महागात पडले.राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या सतिश कन्नन याने चढाईत एकमात्र छाप पाडत ९ गुण मिळविले. या सत्रात यु मुम्बाला आणखी एक लोण स्विकारावा लागला. या लोणनंतर हरियानाची ३७-२१ अशी सोळा गुणांची आघाडी भक्कम झाली आणि यु मुम्बा यातून बाहेर पडूच शकली नाही.