अरुप बिस्वास यांनी दिला राजीनामा(फोटो-सोशल मीडिया)
Sports Minister Arup Biswas has resigned : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नुकताच भारताला भेट देऊन गेला. भारतात आल्यानंतर तो सुरवातीला पश्चिम बंगालमधील साल्ट लेक स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. तिथे मेस्सी स्टेडियममधून लवकर गेलयाने चाहते नाराज झाले आणि हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बिस्वास यांनी १५ डिसेंबर रोजी क्रीडा विभागाच्या पदावरून राजीनामा देऊन “निष्पक्ष चौकशी” करण्याची मागणी देखील केली होती. त्यांचा राजीनामा स्वीकारताना, मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांची भावना आणि हेतूंचे कौतुक केले जात आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर राज्य सरकारकडून पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कुमार आणि विधाननगरचे पोलिस आयुक्त मुकेश कुमार यांना “कारणे दाखवा नोटीस” बजावण्यात आली आहे. विधाननगरचे उपायुक्त अनिश सरकार यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार सिन्हा आणि साल्ट लेक स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी देब कुमार नंदन यांच्यावर देखील विभागीय कारवाई केली आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश आशिष कुमार रॉय यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली गेली होती. ज्याच्या आधारे चार वरिष्ठ आयपीएस अधिकारी पीयूष पांडे, जावेद शमीम, सुप्रतिम सरकार आणि मुरलीधर यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) देखील स्थापन करण्यात आले. स्टेडियममधील गोंधळ आणि व्यवस्थापनातील निष्काळजीपणाची एसआयटी सखोल चौकशी करणार आहेत.
भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्याकडून आरोप करण्यात आले आहे की, क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी या कार्यक्रमासाठी २२,००० तिकिटे गोळा केली, ती त्यांच्या समर्थकांना वाटण्यात आली. तसेच काही बेकायदेशीर बाजारात देखील विकली आहेत. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचे ठोस पुरावे सापडल्याचा दावा देखील अधिकारी यांनी केला आहे. हिंसाचारानंतर राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी त्यांनी एका दिवसात स्टेडियमला भेट दिली आणि चौकशीसाठी न्यायालयीन कारवाईची शिफारस देखील केली. पोलिसांनी आतापर्यंत कारवाई करत आयोजक शताद्रु दत्ता आणि पाच प्रेक्षकांना अटक केली आहे.
हेही वाचा : IPL 2026 Mini Auction: लिलावात ‘या’ ५ खेळाडूंवर झाली कोट्यवधींची उधळण! भारतीय अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब पालटले






