मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Shami’s contract with Lucknow Super Giants : भारतीय क्रिकेट संघात परतण्यासाठी संघर्ष करत असणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. एका अहवालांनुसार सनरायझर्स हैदराबादने मोहम्मद शमीला लखनऊ सुपर जायंट्सशी व्यापार करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. या करारासाठी ते लखनऊला १० कोटी रुपये देणार आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावामध्ये हैदराबाद संघाकडून मोहम्मद शमीला या किमतीत खरेदी करण्यात आले होते.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, दोन्ही फ्रँचायझींनी शमीचा व्यापार करण्यास सहमती दर्शविली असून आता, ते फक्त शमीच्या परवानगीची वाट पाहत आहेत. आयपीएलकडून फ्रँचायझींना त्यांच्या २०२५ च्या संघातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
मोहम्मद शमीने मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. तेव्हापासून भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवता आलेले नाही. मोहम्मद शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना दिसत असून या स्पर्धेत तो शानदार कामगिरी करत आहे. मोहम्मद शमीने कबूल केले की तो कठीण काळातून जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्याला संधी देण्यात आलेली नाही.
२०२२-२४ च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहम्मद शमीने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर, मागील हंगामात आयपीएल २०२५ च्या लिलावात एसआरएचने त्याला १० कोटी रुपयांना खरेदी केले होते. आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये त्याने पहिल्या सहा षटकांत २८ बळी घेतले. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२४ ला मुकला होता. तथापि, गेल्या हंगामात त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती.
एलएसजी संघात शमीचा समावेश भारतीय वेगवान गोलंदाज आवेश खान, मयंक यादव आणि मोहसिन खान यांच्या तंदुरुस्तीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. हे तिघे देखील सध्या विविध दुखापतींमुळे पुनर्वसन प्रक्रियेतून जात असून ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाहीत.






