विराट कोहली आणि त्याचा पुतण्या आर्यवीर कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Delhi Premier League : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडून अलिकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली होती. आयपीएलप २०२५ नंतर तो मैदानावर खेळताना दिसलेला नाही. त्याने आधीच टी-२० क्रिकेटमधून देखील निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे. तथापि, आता त्याच्या पुतण्याने कोहलीचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी घेतल्याचे दिसत आहे. कोहलीचा पुतण्या आर्यवीर कोहलीचा दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावात स्थान मिळाले आहे.
दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावाच्या ड्राफ्टमध्ये विराट कोहलीच्या पुतण्या आर्यवीर कोहलीसोबत, वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागचा देखील समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेचा लिलाव ५ जुलै रोजी पार पडणार आहे.
आर्यवीर कोहली हा त्याचा काका विराट कोहलीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या शैलीचा खेळाडू असून तो लेग स्पिनर आहे. पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षक राज कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रशिक्षण घेत आहे. राज कुमार शर्मा यांनी देखील विराट कोहलीला प्रशिक्षण दिले होते. आर्यवीर कोहलीला सी श्रेणीत स्थान मिळाले आहे. २०२४-२५ मध्ये आर्यवीर हा दिल्ली अंडर-१६ संघासाठी नोंदणीकृत खेळाडू आहे.
याचबरोबर, वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर दिल्ली अंडर-१९ संघात खेळला असून त्याने मेघालयाविरुद्ध २९७ धावांची शानदार खेळी खेळली होती. या कामगिरीमुळे त्याला श्रेणी बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच त्याचा धाकटा भाऊ वेदांत सेहवाग, जो ऑफ-स्पिनर आहे, तो देखील दिल्ली अंडर-१६ संघाचा भाग आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘ECB कडून झाली मोठी चूक..’ पतौडी यांचा अपमान केल्याने माजी खेळाडूचा संताप अनावर
या वर्षीच्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एकूण आठ फ्रँचायझी खेळताना दिसणार आहे. सध्याच्या सहा संघांमध्ये आऊटर दिल्ली आणि नवी दिल्ली हे दोन नवीन संघाचा समावेश देखील होणार आहे. ज्यामध्ये ईस्ट दिल्ली रायडर्स, नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स, वेस्ट दिल्ली लायन्स, साउथ दिल्ली सुपरस्टार्स, ओल्ड दिल्ली ६ आणि सेंट्रल दिल्ली किंग्ज या संघांचा आधीच समावेश करण्यात आला आहे.