यश दयाल(फोटो-सोशल मीडिया)
Sexual Harassment Case : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आणि भारतीय खेळाडू यश दयालच्या अडचणीत वाढ झाली आहे. गाझियाबादमधील एका महिलेकडून त्याच्यावर लग्नाचे आश्वासन दाखवून फसवणूक आणि शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने यशविरुद्ध पोलिस तक्रार देखील दाखल केली आहे.
अलीकडेच झालेल्या आयपीएल २०२५ मध्ये यश दयालने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संघाला विजेतेपद मिळून देण्यास मोठ योगदान दिले आहे. आता यशने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून त्याच महिलेविरुद्ध प्रयागराज पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे. त्याने महिलेवर चोरीचा आरोप लावला आहे. यशने असे म्हटले आहे की, तिने त्याच्या आयफोन आणि लॅपटॉपची चोरी केली आहे. २७ वर्षीय खेळाडू यश दयालकडून प्रयागराजमधील खुलदाबाद पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, तक्रारीमध्ये यश दयालने महिलेवर खोटे आरोप करण्याचा आणि वस्तू चोरल्याचा आरोप केला आहे. यानंतर यश दयालने प्रयागराज पोलिसांना सांगितले की, २०२१ मध्ये त्याची त्या महिलेशी इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली होती, त्यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलायला सुरवात केली आहे. दयालकडून असा देखील आरोप करण्यात आला आहे की, महिलेने स्वतःच्या आणि तिच्या कुटुंबाच्या उपचारांच्या बहाण्याने त्याच्याकडून लाखो रुपये उधार घेऊन ते परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अजून देखील ते पैसे परत दिले नाहीत.
दयालने असा देखील दावा केला आहे की, महिला खरेदीसाठी त्याच्याकडून वारंवार पैसे उधार घेत असे. त्यानंतर, तो म्हणाला की तो जे डाव करत आहे, ते सर्व पुरावे च्याकडे आहेत. दयालने असेही म्हटले की, जेव्हा महिलेने त्याच्याविरुद्ध गाझियाबाद पोलिसात तक्रार दाखल केली ही गोष्ट दयालला कळली तेव्हा त्यानेही तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यश दयालकडून महिलेविरुद्ध, तसेच तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरुद्ध आणि इतर काही जणांविरुद्ध तीन पानांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच त्याने त्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : MLC 2025 मध्ये वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा अफलातून कारनामा; सामना न खेळताच मॅक्सवेलच्या टीमची अंतिम फेरीत धडक
महिलेने दयालवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच वेळी, महिलेने यश दयालविरुद्ध इंदिरापुरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यशने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत हा गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे. महिलेने यापूर्वी २१ जून रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देखील या प्रकरणाची ऑनलाइन तक्रार पाठवली होती.






