आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची जोड
मुंबई/नीता परब: आयुर्वेद ही हजारो वर्षांची जुनी भारतीय परंपरा आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नैसर्गिक घटकांवर आधारित आहे. यात पंचमहाभूते (पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश) आणि त्रिदोष (वात, पित्त, कफ) या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. यामध्ये औषधी वनस्पती, आहार, व्यायाम आणि दिवसभरातील दिनचर्या यावर भर दिला जातो, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि आजारांना प्रतिबंध होतो.
मागील काही वर्षात आयुष विभागाने आयुर्वेदामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश केल्याने आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची जाेड मिळाली आहे. परिणामी, रुग्णांच्या संख्येचा ओघही वाढला आहे. या नव्या तंत्रज्ञानाबरोबर सांगड घालत महाराष्ट्र राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्येदेखील आता विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाची नवी दालने खुली झाली आहेत. याच धर्तीवर मुंबईतील पाेदार आयुर्वेदिक महाविद्यालयात देखील अत्याधुनिक यंत्रणांमुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. मुंबईतील वरळी येथील पाेदार आयुर्वेदिक रुग्णालयात २६० खाटा असून एकूण १४ विभाग कार्यरत आहेत. दिवसभरात ८०० ते ९०० रुग्ण ओपीडीत उपचारासाठी दाखल होत असतात. उपलब्ध नव्या तंत्रज्ञानाचा वापर शिकत असलेल्या ८०० ते ९०० विद्यार्थ्यांंना हाेत आहे.
नवे तंत्रज्ञान काय ?
स्किल लॅब ही १२ काेटीची अत्याधुनिक यंत्रणा पाेदार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नुकतीच दाखल झाली आहे. ही अत्याधुनिक तंत्रज्ञान ही मानवी प्रतिकृतीची संलग्न आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून विद्यार्थींना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. ज्यात सीपीआर, ईसीजी, लहान मुलांवरील विविध आजारांचे उपचार, अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक अभ्यास, याशिवाय मानवी प्रतिकृतीच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, विविध आजारांच्या शस्त्रक्रियाबाबत प्रशिक्षण, गुडघेदुखी, सांधेदुखी, पंचकर्म प्रक्रिया, नाॅर्मल बाळंतपण कसे करावे, फ्राेजन शाेल्डर इत्यादी सारख्या विकारांवर विद्धअग्नी उपचार पद्धती आणि विविध उपचार पद्धतीअभ्यासाबाबत प्रशिक्षण या मानवी प्रतिकृतीच्या माध्यमातून विद्यार्थी घेत आहेत. याशिवाय अत्याधुनिक पॅथाॅलाॅजी लॅबमध्ये विविध रक्ताच्या तपासण्याची सुविधा, डिजिटल एक्स-रे इत्यादी सुविधा आता पाेदार रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैशांची बचत हाेत आहे.
अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….
राज्यात स्कील लॅब यंत्रणा कुठे?
आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, यांच्या माध्यमाने मुंबईतील पाेदार महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यात ही स्कील लॅब उपलब्ध झाली आहे व येत्या काही दिवसात राज्यातील इतर शासकीय महाविद्यालयातही ही यंत्रणा उपलब्ध हाेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
थ्री डी कॅडेव्हर विच्छेदन टेबल
थ्री डी कॅडेव्हर विच्छेदन टेबल याचादेखील नव्या तंत्रज्ञानाचा आयुर्वेद महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. बहुतांशीवेळा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मानवी मृत शरीर उपलब्ध होत नाही, अशावेळी थ्रीडी कॅडेव्हर डिटेक्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासाचे धडे दिले जात आहेत. यात संबंधित यंत्रणेवर विविध सर्जरी, मानवी शरीराचा अभ्यास, विविध आजारांवर शरीरातील काेणत्या अवयवांवर उपचार कसा करायचा हा अभ्यास या थ्री डी कॅडेव्हर विच्छेदन टेबलच्या मदतीने केले जाते. थ्रीडी कॅडेव्हर टेबल हे नुकतेच पाेदार महािवद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रुग्णसेवेत दाखल झाले आहे.
पाेदारमध्ये असलेल्या स्कील लॅब आता विद्यार्थ्यांसाठी खुले
स्किल लॅब ही अत्याधुनिक यंत्रणा आता मुंबई शहरातील इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी खुले करणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. संपदा संत यांनी दिली. संबंधित यंत्रणा अद्याप इतर वैद्यकीय महाविद्यालयात पूर्णत: उपलब्ध नसल्याने सदर यंत्रणेची ऑपरेिटंग सिस्टम व त्याचा वापर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल आहे. ज्यामुळे इतर र्वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न विद्यार्थ्यांना अभ्यासाचे हे दालन खुले करण्याचा मानस असल्याचे डाॅ. संपदा संत म्हणाल्या.
आयुर्वेदामध्ये नवे बदल
आयुर्वेद अभ्यासामध्ये नवे नवे तंत्रज्ञान येत असल्याने आता प्राचीन आयुर्वेदामध्ये बदल घडत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आयुर्वेदाबराेबर नवे तंत्रज्ञानाचा देखील अभ्यास हाेत आहे. याशिवाय रुग्णालयात १४ विविध विभाग आहेत, ज्यात विविध आजारांवर उपचार केला जात आहे. यात ओषधे व उपचार पध्दतीला नवीन नवीन प्रयाेगाची जाेड दिली जात आहे. पंचकर्म थेरपी, जुने आजार यावर उपचार माफक दरात उपलब्ध आहेत.
तसेच पेन मॅनेजमेंट थेरपी, सुवर्ण प्राशन, वार्धक्यजन्य विकार, याेग थेरपी, स्थैल्य चिकित्सा अशा विविध आजारांवरील उपचार देखील माफक दरात उपलब्ध आहेत. रुग्णालयातील नव्या तंत्रज्ञानाची ट्रेनिंग विद्यार्थ्यांसाेबत नर्सिंग स्टाफ, कर्मचाऱ्यांनादेखील देण्यात येत आहे, अशी माहिती डाॅ. संपदा संत, अधिष्ठाता, पाेदार आयुर्वेदिक महाविद्यालय यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली.