'कर्मचाऱ्यांनी ChatGPT आणि DeepSeek वापरू नये...', केंद्र सरकारने दिला इशारा! काय आहे कारण?
संपूर्ण जगात ChatGPT आणि DeepSeek ने खळबळ उडवली आहे. आतापर्यंत इटली, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाने DeepSeek वर बंदी घातली आहे. तसेच यूएस नेव्हीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना DeepSeek चा वापर न करण्याचे आदेश दिले आहे. OpenAI ने DeepSeek वर आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. हा सर्व वाद सुरु असतानाच आता भारताच्या केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारत सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने ChatGPT आणि DeepSeek या दोन्हींचा वापर करू नये.
भारत सरकारने कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या आदेशात AI अॅप्स आणि AI प्लॅटफॉर्मबाबत आवश्यक माहिती देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात, सरकारी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की काही कर्मचारी ऑफिसच्या संगणक आणि लॅपटॉपमध्ये AI अॅप्स जसे की चॅटजीपीटी, डीपसीक इत्यादींचा वापर करतात, जे भारत सरकारच्या गोपनीय कागदपत्रे आणि डेटासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ऑफिसच्या संगणक आणि लॅपटॉपमध्ये AI अॅप्सचा वापर करू नये. याबाबत एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. फोटो सौजन्य – Pinterest)
केंद्र सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी संगणक, लॅपटॉप आणि उपकरणांमध्ये AI अॅप्स आणि टूल्सचा वापर करू नये. डेटा आणि गोपनीयतेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, ते याद्वारे AI वापरकर्त्यांना निराश करणं हा या निर्णयमागचा उद्देश नसून भारत सरकारच्या गोपनीय कागदपत्रे आणि डेटाची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
भारतात अनेक परदेशी AI अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये चॅटजीपीटी, डीपसीक आणि गुगल जेमिनी इत्यादी समाविष्ट आहेत. भारतातील बरेच लोक त्यांचे काम सोपे करण्यासाठी या AI अॅप्सचा वापर करतात. शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफीसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला AI अॅप्स पाहायला मिळतील. मात्र आता केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना AI अॅप्सचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. डिव्हाइसवर AI अॅप्स किंवा टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर, ते आवश्यक परवानग्या मागतात. अशा परिस्थितीत सरकारी फायलींचा डेटा लीक होण्याचा धोका कायम आहे.
AI अॅप्स आणि AI चॅटबॉटच्या मदतीने, बरेच लोक प्रॉम्प्ट देऊन पत्रे, लेख किंवा भाषांतर इत्यादी काम करू शकतात. बरेच लोक प्रेझेंटेशन इत्यादी करण्यासाठी देखील याचा वापर करतात. AI रोजच्या अनेक कामांसाठी देखील फायदेशीर आहेत. यामध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जी तुम्हाला तुमच्या सर्व कामांत मदत करतात.
चिनी स्मार्टअप DeepSeek ला अलिकडेच लोकप्रियता मिळाली आहे आणि या स्टार्टअपने त्याच्या परवडणाऱ्या किमतीमुळे AI क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. हे चिनी स्टार्टअप सुमारे 20 महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. 20 जानेवारी 2025 रोजी, DeepSeek R1 चॅटबॉट अचानक खूप लोकप्रिय झाले आणि जुन्या AI कंपन्यांचे अनेक रेकॉर्ड तोडले.