हिटलरला आज कोण ओळखत नाही. इतिहासातील सर्वात क्रूर शासक म्हणून हिटलर जगभर प्रसिद्ध होता आणि आजही आहे. तुम्हाला माहित आहे का? ॲडॉल्फ हिटलरने जर्मनीच्या बाल्टिक समुद्रातील रुजेन बेटावर जगातील सर्वात मोठे हॉटेल बांधण्याची योजना आखली होती, परंतु नशिबाला ते मंजूर केले नव्हते, ज्यामुळे हिटलरचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. चला याबाबत आज सविस्तर जाणून घेऊयात.
हिटलरच्या आदेशावरून कोलोसस ऑफ प्रोरा (Hotel Colossus Of Prora) या ठिकाणी 9 हजार मजूर तैनात करण्यात आले, त्यांनी या हॉटेलच्या बांधकामात रात्रंदिवस काम केले आणि 3 वर्षे हे काम सुरू राहिले. 1936 मध्ये सुरू झालेले बांधकाम 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर थांबले तेव्हा याच्या कथेला कलाटणी मिळाली. 237.5 दशलक्ष जर्मन चलन म्हणजेच सुमारे 80 अब्ज रुपये खर्च करूनही हिटलरचा हा ड्रीम प्रोजेक्ट का पूर्ण होऊ शकला नाही… हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हिटलरला हॉटेलमध्ये 20,000 खोल्या बांधायच्या होत्या, जिथे जर्मन लोक, विशेषतः सैनिक, कामाच्या तासांनंतर फुरसतीचा वेळ घालवू शकतील. हिटलरचा हा ड्रीम प्रोजेक्ट समुद्राच्या मधोमध वालुकामय जागेवर बांधण्यात आला होता. त्याचे काम 1936 नंतर मोठ्या प्रमाणावर चालू राहिले, परंतु दुसरे महायुद्ध (1939) सुरू झाल्यानंतर हे काम थांबले कारण हिटलरला सर्व 9 हजार कामगार सैन्यात पाठवावे लागले.
हेदेखील वाचा – Bhangarh Fort Story: तांत्रिक शाप, भुताटकीच्या कथा… निर्जन भानगढ़ किल्ल्याचा भव्य इतिहास जाणून घ्या
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी या आलिशान हॉटेलमध्ये आठ हाउसिंग ब्लॉक्स, थिएटर आणि सिनेमा हॉल तयार करण्यात आले होते. मात्र स्विमिंग पूल आणि फेस्टिव्हल हॉलचे काम अपूर्ण राहिले. हिटलरला येथे 20,000 बेडरुम बांधायचे होते आणि प्रत्येक खोलीला समुद्राच्या समोर बनवायचे होते. प्रत्येक खोलीचा आकार 5 बाय 2.5 मीटर असावा, दोन बेड, एक वॉर्डरोब आणि एक सिंक असावा, अशी हिटलरची योजना होती. कॉम्प्लेक्सच्या मधोमध खूप मोठी इमारत असावी, गरज पडल्यास त्याचा लष्करी रुग्णालय म्हणून वापर करता येईल, असा विचार होता. मात्र, नशिबाला हे सर्व मान्य नव्हते.
दुसऱ्या महायुद्धानंतर बंद पडलेल्या या हॉटेलच्या काम पुन्हा सुरू होऊ शकले नाही. प्रथम याचा वापर सोव्हिएत सैन्याच्या सैनिकांनी लपण्यासाठी केला गेला. त्यांनतर नॅशनल पीपल्स आर्मी आणि जर्मनीच्या युनिफाइड आर्म्ड फोर्सेसने येथे आश्रय घेतला. युद्धादरम्यान फक्त सैनिकच नव्हे तर सामान्य लोकही येथे लपण्यासाठी येत असत. हळूहळू ही इमारत खचू लागली आणि मोडकळीस येऊ लागली.
हिटलरच्या या ड्रीम प्रोजेक्टची अवस्था अशी होती की, तो सहज विकता येत नव्हता. काही ना काही कारणास्तव, प्रत्येक वेळी त्याच्या या स्वप्नातल्या हॉटेलचा करार रद्द केला जायचा. याचे कारण म्हणजे बहुतेक लोकांचा असा विश्वास होता की, युद्धादरम्यान येथे असंख्य लोकांना आपला जीव गमवावा लागला असेल आणि हे ठिकाण एखाद्या झपाटलेल्या जागेपेक्षा कमी नसेल. हॉटेलचे वेगवेगळे भाग विकण्याचे काम 2004 साली सुरू झाले, त्यामुळे आज प्रत्येक भागाचे खरेदीदार आपापल्या परीने त्याचा वापर करत आहेत.