राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाचा बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसनी घालत दहावीत उत्तुंग यश प्राप्त केले. परंतु आर्थिक कमतरता, गरिबी त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे अनेकांची शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहिली. परंतु शासनाच्या रात्र शाळेमुळे शिक्षणाची अपूर्ण राहिलेली इच्छा अनेक जण रात्र शाळेच्या माध्यमातून पूर्ण करू लागले आहे. यामध्ये गृहिणी, नोकरदार वर्ग, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुढे येऊ लागले आहे. यामध्ये अनेक वर्ष देशसेवेत कर्तव्य बजावल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याची राहिलेली खंत अंकुश पाणमंद या माजी सैनिकाने रात्र शाळेच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. तर पूर्वीच्या काळी विवाहनंतर मुल आणि चूल या संसारांमध्ये अडकल्यामुळे अनेक महिलांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. परंतु संसाराचा गाडा हाकत असताना कायम अपूर्ण शिक्षणाची सल मंगल रांधवन यांना जाणवत होती. त्यांनी तब्बल ३२ वर्षांनंतर जिद्दीने पतीचा वडापावचा व्यवसाय आणि संसाराचा गाडा यशस्वीरित्या हाकत रात्र शाळेच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले आहे.