फोटो सौजन्य: Freepik
सध्याच्या आधुनिक दुनियेत कधी कुठली गोष्ट आपल्याला अचंबित करेल हे सांगता येत नाही. सध्या अशीच एक बातमी सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आपण अनेक व्यक्तींना तसेच जनावरांना वर्ल्ड रेकॉर्ड करताना पाहिले आहे. पण आता चक्क एका कोंबडीने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हो बरोबर वाचत आहात तुम्ही. चला जाणून घेऊया ही नेमकी भानगड काय आहे.
गॅब्रिओल आयलंडची कोंबडी उर्फ लेसी आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक बनली आहे. एका मिनिटात सर्वाधिक गोष्टी ओळखणाऱ्या कोंबडीचा किताब तिने पटकावला आहे. याचा अर्थ असा की जेव्हा लेसीला भिन्न संख्या, रंग आणि अक्षरे दाखवली जातात तेव्हा ती त्यांना ओळखू शकते. तिला आकार ओळखायला सुद्धा शिकवले आहे.
लेसीची मालक एमिली कॅरिंग्टन सांगते की कोंबडीला एखादे विशिष्ट अक्षर किंवा रंग दिसला की त्यांना कळते की जर त्यांनी त्या गोष्टीला चोच मारली तर त्यांना बक्षीस मिळेल. लेसीची मालक एमिली कॅरिंग्टन देखील एक पशुवैद्य आणि कॉमिक्स कलाकार आहे.
मालक एमिली कॅरिंग्टन म्हणते, “मी कोंबड्याना काही युक्त्या शिकवत होते आणि तेव्हा मला वाटले की रिकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न मनोरंजक असेल कारण मी त्यांना खूप प्रशिक्षण देत होते”. गेल्या वसंत ऋतूमध्ये, कॅरिंग्टनने अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी 16 आठवड्यांची अनेक हायलिन पिल्ले खरेदी केली. बॉसी पँट, लेसी, स्पीडी, ब्राऊन चिकन आणि नर्व्हस नेली नावाच्या या कोंबड्यांना अंडी घालण्यासोबतच वेगळे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले. सुरुवातीला फ्रिजवरील मॅग्नेटचा उपयोग करून कॅरिंग्टनने कोंबड्याना शिकवले की जर त्यांनी एखाद्या विशिष्ट चुंबकाला चोच मारली तर त्यांना बक्षीस मिळेल, जे बहुतेकदा धान्याच्या स्वरूपात असायचे.
सुरुवातीला कोंबड्या अक्षरांच्या आकारांमुळे गोंधळून जायच्या, परंतु हळूहळू त्यांना कळले की जर त्यांनी त्या विशिष्ट आकारांवर चोच मारली तर त्यांना बक्षीस मिळेल. एमिली कॅरिंग्टन म्हणतात, “त्यांचे काम फक्त मी त्यांना शिकवलेल्या क्रमांकावर किंवा अक्षरावर चोच मारणे आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष करणे हे होते.”