फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सध्या अपघातांच्या अनेक घटना समोर येत आहेत. या घटनांचे थरारक व्हिडीओ देखील सोशल मी़डियावर पाहायला मिळतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पण ते म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नव्हती असा काहीसा प्रकार घडला आहे. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याच्या बुद्धीमत्तेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे पाहिल्यानंतर सर्वजण पोलिस कर्मचाऱ्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्टनुसार, गोरेगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. जिथे एक व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान तोल गेल्याने तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये पडला. त्याला जवळपास ट्रेनची धडक बसली. तेवढ्यात मुंबई पोलीस हवालदार बाळासो ढगे यांनी तत्काळ त्या व्यक्तीकडे धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढले. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले इतर लोकही मदतीसाठी जमा झाले. कॉन्स्टेबल बाळासो ढगे यांनी आपले शौर्य दाखवून तरूणाचे प्राण वाचवले. मात्र, ते ऑफ-ड्यूटीवर होते. पण त्यांनी ही व्यक्ती अडचणीत असल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ मदत केली.
या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “मुंबईकर सदैव कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर! घरी परतत असताना पीसी बाळासो ढगे यांना गोरेगाव रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये एक माणूस अडकलेला दिसला. “परिस्थितीवर तात्काळ प्रतिक्रिया देऊन, ढगे यांनी अपघात टळला आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवले.” हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण कॉन्स्टेबलचे कौतुक करत आहेत.
हे देखील वाचा – अरेच्चा! चोराने घरात येऊन जेवण केले, साफसफाई केली अन्…; मालकही हैराण
व्हायरल व्हिडीओ
कॉन्स्टेबलचे कौतुक
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mumbaipolice च्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत अनेकांनी लाईक करून शेअर केले आहे. या व्हिडीओवर युजर्सने आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘एकदा पोलिस. नेहमीच पोलिस. ऑन ड्युटी असो वा ऑफ ड्युटी, त्याला त्याचे कर्तव्य माहीत असते. याचा अर्थ प्रत्येकाचे रक्षण करणे.’ तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘कॉन्स्टेबलला त्यांच्या शौर्याबद्दल आणि वेळीच बचाव कार्यासाठी पुरस्कृत करणे आवश्यक आहे! जय मुंबई पोलीस दल!’ तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, “मुंबई पोलीस हे एकेकाळी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम पोलीस होते यात शंका नाही.” व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनी पोलिस कर्मचाऱ्याचे भरभरून कौतुक केले आहे.