जागतिक विक्रम (World Record) करण्याचे खूळ एकदा का डोक्यात बसले की त्यासाठी लोक कोणतेही टोक गाठतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. केवळ गिनीस वर्ल्ड (GWR) बुक मध्ये असलेला विक्रम मोडून तो आपल्या नावे नोंदला जावा, यासाठी एका व्यक्तीने ‘तिखट’ कृत्य केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) च्या हवाल्यानुसार, कॅलिफोर्नियाचे रहिवासी ग्रेगरी फॉस्टर(Gregory Foster) यांनी १७ सप्टेंबर रोजी ८. १५ सेकंदात कॅरोलिना रीपर (Carolina Reaper) प्रचातीच्या १० मिरच्या खाऊन एक विक्रम मोडीत काढला आहे.
कॅरोलिना रीपर ही जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते. उल्लेखनीय असे की, ग्रेगरी फॉस्टर यांनी स्वत:चाच विक्रम मोडला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ग्रेगरी फॉस्टर यांनी ३३. १५ सेंकंदात ३ कॅरोलिना रीपर मिरच्या खाण्याचा विक्रम केला होता. जो त्यांनी स्वत:च मोडला.
GWR ने सांगितले की, कॅरोलिना रीपर ही जगातील सर्वात तिखट म्हणून ओळखली जाणारी मिरची आहे. या मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी अभ्यासक स्कॉविले हीट युनिट्स वापरतात. रासायनिक संयुगांची एकाग्रता निश्चित करून ही पद्धत पदार्थाची ‘मसालेदारपणा’ ठरवते. कॅरोलिना रीपर्स मिरचीची १,६४१,१८३ स्कोविले हीट युनिट्स आहेत.