खळबळजनक! फिफा वर्ल्डकपआधी मोरोक्कोमध्ये 3 दशलक्ष रस्त्यावरील श्वानांचा दिला जाणार बळी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मोरोक्को : मोरोक्कोमध्ये फिफा वर्ल्डकप 2030 च्या तयारीसाठी 3 दशलक्ष रस्त्यावरील श्वान मारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या धक्कादायक निर्णयामुळे प्राणीप्रेमी आणि हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. शहर सुशोभित करण्याच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या या क्रूर निर्णयावर जगभरात टीका होत आहे.
शहर स्वच्छतेच्या नावाखाली क्रूरता
फिफा वर्ल्डकपसारख्या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे मोरोक्कोवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा उंचावण्याचा दबाव आहे. त्यासाठी शहरांना स्वच्छ आणि आकर्षक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 3 दशलक्ष भटक्या श्वानांना मारण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. अहवालांनुसार, मोरोक्कोमध्ये दरवर्षी सुमारे 3 लाख रस्त्यावरील श्वान मारले जातात. मात्र, फिफा वर्ल्डकपच्या आयोजनामुळे ही संख्या झपाट्याने वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्राणी हक्क संघटनांची तीव्र प्रतिक्रिया
या निर्णयामुळे प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. श्वानांचा असा मोठ्या प्रमाणावर बळी देणे हे अत्यंत क्रूर असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. शहरांचे स्वरूप सुधारण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी श्वानांच्या हत्या करणे हा पर्याय योग्य आहे का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : परदेशातील कटू सत्य! लंडनमध्ये एक लाख रुपयांच्या भाड्याच्या घरातही या माणसाला येतोय चाळीत राहिल्याचा फील; पाहा व्हिडिओ
फिफा वर्ल्डकपचे महत्त्व आणि मोरोक्कोवरील जबाबदारी
फिफा वर्ल्डकप हा केवळ फुटबॉलचा खेळ नसून तो जगभरातील विविधतेचा उत्सव आहे. जगभरातून कोट्यवधी लोक या स्पर्धेकडे आकर्षित होतात. मोरोक्कोसाठी हा कार्यक्रम जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची एक मोठी संधी आहे. यजमान देश म्हणून मोरोक्कोला प्रेक्षकांसाठी भव्य अनुभव तयार करण्याची जबाबदारी आहे. मात्र, त्यासाठी असे वादग्रस्त आणि अमानवी निर्णय घेणे योग्य ठरते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जागतिक स्तरावर मोरोक्कोवर टीका
फिफा वर्ल्डकपच्या आयोजनासाठी मोरोक्कोने स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्वानांच्या बळीचा मार्ग अवलंबणे जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे मोरोक्कोला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण आणि प्राणी हक्कांबाबत जागरूकता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना, मोरोक्कोसारखा देश अशा निर्णयाने आंतरराष्ट्रीय समाजात चुकीचा संदेश देत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शेख हसीना यांचे खळबळजनक वक्तव्य; ‘माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, मृत्यू जवळच होता मी 25 मिनिटांनी वाचले’
पर्यायी उपाययोजना आवश्यक
शहर सुशोभित करण्यासाठी श्वानांच्या हत्येऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील श्वानांचे लसीकरण, त्यांना आश्रयस्थाने उपलब्ध करून देणे किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे, हे अधिक योग्य निर्णय ठरू शकतात.
हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रबळ मागणी
मोरोक्कोच्या या क्रूर निर्णयावर जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी मोरोक्कोला हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रबळ मागणी केली आहे. फिफा वर्ल्डकपसारख्या भव्य स्पर्धेमुळे यजमान देशांवर मोठ्या प्रमाणावर जबाबदाऱ्या येतात, मात्र त्या पार पाडण्यासाठी प्राण्यांचा बळी घेणे हा योग्य मार्ग नसल्याचे जगभरातून बोलले जात आहे.