पेरूमध्ये सापडलेल्या ३८०० वर्ष जुन्या शहराने तज्ज्ञांना धक्का, प्राचीन अमेरिकन संस्कृतीबद्दल नवीन रहस्ये उघड, जुन्या समजुती मोडल्या जाणार! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पेरूमध्ये ३,८०० वर्षे जुने प्राचीन शहर “पॅनिको” सापडले असून ते अमेरिकन संस्कृतीबद्दलच्या जुन्या समजुतींना हादरा देत आहे.
हे शहर कॅरल संस्कृतीचे अवशेष असून येथे मंदिरे, निवासी संकुले आणि भूकंप-प्रतिरोधक वास्तू सापडल्या आहेत.
पुराव्यानुसार, कॅरल लोकांनी हवामान आपत्तींचा सामना केला पण अखेर दुष्काळामुळे ही संस्कृती नष्ट झाली.
Peñico archaeological site : पेरूच्या सुपे व्हॅलीमध्ये झालेल्या एका अद्वितीय शोधामुळे जगभरातील इतिहासकार आणि पुरातत्त्वतज्ज्ञांना प्रचंड धक्का बसला आहे. वाळवंटी टेकड्यांखाली दडलेल्या ३,८०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन शहर “पॅनिको” चा शोध लागला आहे. हा शोध केवळ पेरूचाच नव्हे तर संपूर्ण अमेरिकन खंडाच्या प्राचीन इतिहासाविषयी आपली समज बदलून टाकणारा आहे.
जुलै २०२५ मध्ये पेरूच्या ख्यातनाम पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. रूथ शेडी यांनी या शहराचे अस्तित्व जगासमोर आणले. हे शहर प्राचीन कॅरल संस्कृतीचा एक भाग होते. आतापर्यंत असे मानले जात होते की अमेरिकेतील पहिल्या महान संस्कृती माया, अझ्टेक किंवा इंका होत्या. पण हा शोध सांगतो की अझ्टेक व इंका यांच्याही हजारो वर्षांपूर्वी कॅरल लोकांनी प्रगत समाजरचना, व्यापार जाळे आणि कला विकसित केली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेनचा थेट रशियाच्या अर्थव्यवस्थेवरच घाला; Russia मध्ये अचानक पेट्रोलचा तुटवडा, वाचा का ते?
सुमारे इ.स.पू. ३००० ते इ.स.पू. १८०० या काळात कॅरल लोक येथे राहत होते. त्यांची संख्या सुमारे ३,००० इतकी होती. त्यांच्या शेजारी लहान गावेही होती. सुपे व्हॅलीचे धोरणात्मक स्थान पॅसिफिक किनाऱ्याला सुपीक अँडियन खोऱ्यांशी आणि दूरच्या अमेझॉनशी जोडत होते. यामुळे सांस्कृतिक आणि व्यापारी देवाणघेवाण प्रचंड वाढली. कॅरल लोक कापूस, गोड बटाटे, मिरच्या, स्क्वॅश यासारखी पिके घेत. पर्वतरांगांतून खनिजे आणून व्यापार करीत. अगदी गिलहरी व माकडे पाळीव प्राणी म्हणून ठेवत.
कॅरल लोकांची वास्तुकला अत्यंत विकसित होती. भूकंप-प्रतिरोधक अँफीथिएटर, मोठ्या ध्वनीक्षमता असलेल्या मैफिलींची ठिकाणे आणि धार्मिक विधींसाठी मंदिरे यांचा शोध येथे लागला आहे. सर्वांत रोचक म्हणजे, येथे ३२ बासऱ्या पेलिकन पक्ष्यांच्या हाडांपासून बनवलेल्या अवस्थेत सापडल्या. या वाद्यांचा उपयोग धार्मिक समारंभात केला जात असे. या शोधावरून स्पष्ट होते की कॅरल लोक संगीत, कला आणि सामाजिक समारंभांना फार महत्त्व देत होते.
इतकी प्रगत संस्कृती असूनही कॅरल समाज अचानक कोसळला. कारण होते हवामान बदल. सुमारे ४,००० वर्षांपूर्वी सलग दुष्काळ पडल्यामुळे नद्या आटल्या, शेतं उजाड झाली आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कॅरल लोकांना आपली वस्ती सोडावी लागली. मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले आणि अखेरीस ही संस्कृती नष्ट झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Qatar Strike : कतारमध्ये हमास नेत्यांना लक्ष्य करण्यास ‘मोसाद’ने दिला होता साफ नकार; नेतान्याहूंच्या हवाई हल्ल्यावर मोठा वाद
या शोधामुळे पेरूचाच नव्हे तर संपूर्ण अमेरिकेच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. मेसोपोटेमिया व इजिप्तच्या शहरी केंद्रांप्रमाणेच, पेरूमधील कॅरल संस्कृती देखील जगातील प्राचीन व समृद्ध समाजांपैकी एक होती. आज वाळवंटी वाळूमध्ये गाडलेले हे शहर जगाला सांगते की प्राचीन समाज हवामान बदलाशी लढा देत होते, आणि त्यांच्या अनुभवातून आपण आजही शिकू शकतो.