WHO वर राहिला नाही जागतिक नेत्यांचा विश्वास? ट्रम्पला दुजोरा देत अर्जेंटिना देखील पडला बाहेर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ब्यूनस आयर्स: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मायली यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष झेवियर मायली यांचा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा त्यांच्या सहकारी आणि मैत्रीपूर्ण देश अमेरिकेने देखील आपले सदस्यत्व काढून घेतले आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी देखील राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेताच 21 दिवसांत WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली यांनी अनेक मतभेदांचे कारण देत संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संघनेशी संबंध संपवण्याचा आदेश दिला आहे.
जागतिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याला फटका
अर्जेंटिनाच्या या निर्णयामुळे जागतिक आरोग्य सहकार्याला आणखी धक्का बसला असून संघटना कमकुवत होण्याची शक्यता आहे. WHO च्या 2024-25 च्या अंदाजित 6.9 अब्ज डॉलरच्या बजेटपैकी अर्जेंटिनाचा आर्थिक वाटा फक्त 80 लाख डॉलर होता. यामुळे संघटनेवर आर्थिकदृष्ट्या मोठा परिणाम होणार नाही, परंतु एका महत्त्वाच्या सदस्य देशाने WHO सोडणे हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेचे कारण आहे.
अर्जेंटिनाचे स्पष्टीकरण
अर्जेंटिनाचे प्रवक्ते मॅन्युएल एडोर्नी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही निर्णय कोविड-19 च्या महामारीच्या काळातील आरोग्य धोरणांवरु झालेल्या मतभेदांमुळे घेतला आहे. अर्जेंडिनाच्या मते, WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे मानवी इतिहासातील सर्वात मोठे लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक देशांवर आर्थिक आणि सामाजिक परिणाम झाला. एडोर्नी यांनी असा आरोप केला की, WHO वर काही शक्तिशाली देशांचा प्रभाव वाढला असून त्यामुळे त्याची स्वतंत्रता कमी झाली आहे.
WHO ची प्रतिक्रिया
WHO ने अर्जेंटिनाच्या घोषणेवर विचार सुरू असल्याचे म्हटले आहे. WHO ही जागतिक आरोग्य संकटांवर नियंत्रण ठेवणारी एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे. इबोला, एड्स, मंकी पॉक्स आणि नवीन साथीच्या रोगांवर जागतिक स्तरावर समन्वय साधण्याची जबाबदारी WHO कडे आहे. मात्र, काही देशांना असे वाटते की, या संस्थेने घेतलेले काही निर्णय राजकीय प्रभावाखाली असतात. अर्जेंटिनाने हा मुद्दा उपस्थित करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मायलींच्या निर्णयावर जागतिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या निर्णयाला विरोध केला असून यामुळे जागतिक आरोग्य सहकार्याला धोका निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे. पुढील काळात अर्जेंटिना आणि WHO यांच्यातील संबंध कसे राहतील, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.