अमेरिकेत ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी अन्यायकारक आदेश? डोनाल्ड ट्रम्पने घेतला मोठा निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेताच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता त्या निर्णयांवर अमंलबजावणी सुरु आहे. शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतील लिंग विविधता संपवणाऱ्या निर्णयावर देखील स्वाक्षरी करण्याची घोषणा केली होती. अमेरिकन संघीय सरकार आता फक्त दोन लिंगान मान्यता देईल असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा एक आणखी मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्याच्या बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतर ट्रान्सजेंडर खेळाडूंना मुलींच्या आणि महिलांच्या खेळांमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, आता “या कार्यकारी आदेशासह, महिला खेळांवरील युद्ध समाप्त झाले आहे.”त्यांनी हा निर्णय व्हाइट हाउसमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या वेळी घेतला. या वेळी अनेक महिला खेळाडू आणि मुली उपस्थित होत्या.
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, “आम्ही महिला खेळाडूंच्या अभिमानास समर्थन देऊ आणि पुरुषांना आमच्या महिला आणि मुलींना, जखमी करण्यास , मारहाण करण्यास आणि फसण्यास परवानगी देणार नाही. आता पासून, महिला खेळ फक्त महिलांसाठीच असेल.” डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशानुसार, ज्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांना, ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला संघांमध्ये सहभागी होऊ देतात, त्यांना फेडरल निधी नाकारला जाईल.
ऑलिम्पिकपूर्वी ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या सहभागाच्या नियमांत बदल
याशिवाय ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरही दबाव आणण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वी ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या सहभागाबाबतचे नियम बदलले येणार आहेत.
ट्रान्सजेंडर समुदाय आणि समर्थकांमध्ये नाराजी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ट्रान्सजेंडर समुदाय आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांचा आदेश भेदभावपूर्ण आहे आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारांवर आघात करत आहे. ट्रम्प प्रशासनाने यापूर्वीही ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांवर मर्यादा आणणारे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये लष्करातील ट्रान्सजेंडर सैनिकांची भरती रोखणे आणि लिंग बदल प्रक्रियेवर निर्बंध लादणे यांचा समावेश आहे. खरं तरं गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत ट्रान्सजेंडर हक्कावर अनेक मोठे राजकीय वादविवाद झाले. 2024 च्या निवडणुकी प्रचारादरम्यान रिपब्लिकन नेत्यांनी ट्रान्सजेंडर कायद्यांना रद्द करण्याची मागणी केली होती.