फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दमास्कस: सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी बंडखोरांच्या विद्रोहानंतर देश सोडला. त्यांच्या देश सोडून गेल्यानंतर सीरिया बंडखोर गट हयात-तह रहरी गटाच्या नेतृत्त्वाखाली आला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष असद यांचे मोठे वक्तव्य देखील समोर आले. त्यांनी देश सोडून जाण्याचा त्यांचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. सध्या आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध पत्रकार अब्दुलकादिर सेलवी यांचा दावा
बशर अल-असद यांनी देश सोडण्यापूर्वी शत्रू देश इस्त्रायलला गुप्त माहिती दिल्याचा मोठा खुलासा समोर आला आहे. तुर्कीतील प्रसिद्ध पत्रकार अब्दुलकादिर सेलवी यांनी हा दावा केला आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, असद यांनी सीरियातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांबाबतची माहिती इस्त्रायलला दिली होती. यामध्ये शस्त्रागार, क्षेपणास्त्र प्रणाली आणि लढाऊ विमानांच्या स्थानांची माहिती समाविष्ट होती. या माहितीच्या आधारावर इस्त्रायलने सीरियातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत.
इस्त्रायलसोबत गुप्त करार
अब्दुलकादिर सेलवी यांच्या म्हणण्यानुसार, बशर अल-असद यांनी देश सोडून पळून जाण्याच्या काळात स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला होता. इस्त्रायलकडून हवाई हल्ले होण्याची शक्यता टाळण्यासाठी त्यांनी गुप्त लष्करी माहिती दिल्याचे म्हटले जाते. असद यांनी इस्त्रायलला माहिती पुरवल्यानंतर इस्त्रायलने लगेचच सीरियातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले सुरू केले.
सीरियातील परिस्थिती आणि असद यांचा पलायन
नोव्हेंबरच्या शेवटी सीरियात विद्रोह सुरू झाला होता. विद्रोही सैन्यांनी काही दिवसांतच राजधानी दमास्कसवर कब्जा केला. या परिस्थितीत बशर अल-असद यांनी देश सोडून रशियात पलायन केले, जिथे त्यांना राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आश्रय दिला. बशर अल-असद यांनी मात्र देश सोडण्याच्या निर्णयामागे कोणताही पूर्वनियोजित हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, देश सोडण्याचा निर्णय अचानक परिस्थितीमुळे घ्यावा लागला.
अब्दुलकादिर सेलवी यांच्या मते, असद यांचा इस्त्रायलसोबतचा संबंध आणि पलायनामागील इतरही अनेक गुप्त गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही. विद्रोहाच्या काळातइस्त्रायलच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. इस्त्रायलने सीरियातील लष्करी ठिकाणांवर केलेले हल्ले आणि त्यावेळी असद यांच्या पलायनाची वेळ यामध्ये काही संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बशर अल-असद यांचे प्रतिपादन
बशर अल-असद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, देश सोडण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी 8 डिसेंबरपर्यंत आपल्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच त्यांनी देश सोडला. मात्र, विद्रोहाच्या पार्श्वभूमीवर आणि इस्त्रायलच्या भूमिकेमुळे असद यांच्यावरील आरोप आणि संशय अधिक गडद झाले आहेत.