नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्ध मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. त्यातच आर्मेनिया (Armenia) आणि अझरबैजान (Azerbaijan) या देशांमध्येही संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात एका रात्रीत १०० सैनिकांचा मृत्यू (Soldiers Death) झाला आहे. दोन्ही देशांमधील हा संघर्ष (War) आता वाढण्याची शक्यता आहे.
अनेक महिन्यांच्या शांततेनंतर अझरबैजान-आर्मेनिया यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आर्मेनियाच्या सुरक्षा परिषदेने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या दोन्ही देशांतील परिस्थिती अशीच चिघळली तर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. अझरबैजानने सीमावर्ती भागात गोळीबार केल्याचा आरोप आर्मेनियाच्या सुरक्षा मंत्रालयाने केला आहे. तर, आर्मेनियाने लष्करी कारवाई केल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे.
आर्मेनियाने १२ सप्टेंबरच्या रात्री उशिरा सीमेवरील दस्कासन, कलबाजार आणि लाचिन भागात मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई केल्याचा आरोप अझरबैजानने केला. आर्मेनियन सशस्त्र दलांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्या लष्करी चौक्या आणि पुरवठा लाइन रस्त्यांच्या दरम्यानच्या भागात स्फोटके पेरली. यामुळे अझरबैजानला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बचावात्मक उपाययोजना करण्यास प्रवृत्त केले, असे अझरबैजानकडून सांगण्यात आले आहे.