तैवान संकटात! ६ चिनी युद्धनौका आणि १८ विमानांनी 'रेड लाईन' ओलांडली; लष्कर हाय अलर्टवर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
जगाच्या पाठीवर आधीच रशिया-युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष पेटलेला असताना, आता आशिया खंडातही युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. चीन आणि तैवानमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून, ‘ड्रॅगन’ने तैवानभोवती लष्करी विमाने आणि युद्धनौकांचा वेढा अधिक घट्ट केला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने (MND) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत चीनच्या २६ लष्करी विमानांनी आणि ६ नौदल जहाजांनी तैवानच्या उंबरठ्यावर येऊन धडक दिली आहे.
चिनी लष्कराची ही घुसखोरी केवळ नियमित सराव नसून ती एक गंभीर चिथावणी मानली जात आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, या ताफ्यातील १८ विमानांनी तैवान सामुद्रधुनीतील अत्यंत संवेदनशील अशी ‘मध्यरेषा’ (Median Line) ओलांडली. ही रेषा चीन आणि तैवानमधील अनधिकृत सीमा मानली जाते. या विमानांनी तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात (ADIZ) प्रवेश केल्याने तैवानच्या रडार यंत्रणेत खळबळ उडाली. यामध्ये प्रगत लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणि गुप्तचर विमानांचा समावेश होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Penguin: अत्यंत हास्यास्पद! ‘आणि यांना ग्रीनलँड हवाय…’, व्हाईट हाऊसची ‘ती’ पोस्ट ठरली 2026 मधील सर्वात मोठे ट्रोलिंग
चीनच्या या आक्रमक हालचालींना उत्तर म्हणून तैवानने आपले लष्करी सामर्थ्य पणाला लावले आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी आपली लढाऊ विमाने (ROCAF) हवेत तैनात केली आहेत. तसेच, किनाऱ्यावरील क्षेपणास्त्र यंत्रणा (Land-based missile systems) ‘रेडी टू फायर’ मोडमध्ये ठेवण्यात आली आहे. “आम्ही चीनच्या कोणत्याही गैरप्रकाराला चोख उत्तर देण्यास समर्थ आहोत,” असे तैवानच्या लष्करी प्रवक्त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष तैवानसाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वारंवार ‘एकात्मिक चीन’चा नारा दिला असून, तैवानला आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प प्रशासनाचे तैवानला असलेले वाढते समर्थन आणि अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक’ धोरणामुळे चीन अधिकच आक्रमक झाला आहे. ८-९ जानेवारीला झालेल्या मोठ्या युद्धसरावानंतर, आता ही ताजी घुसखोरी म्हणजे मोठ्या हल्ल्याची ‘तालीम’ तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Affairs: UN मध्ये भारताची गुगली! इराणविरोधी ठरावावर ‘No’ म्हणत पाश्चात्य देशांना दिले राजनैतिक पण कठोर प्रत्युत्तर
जर तैवान सामुद्रधुनीत युद्ध भडकले, तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः सेमीकंडक्टर (Semiconductor) पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल. भारत या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती मुजोरी भारतासाठीही चिंतेची बाब आहे, कारण यामुळे सागरी व्यापाराला धोका निर्माण होऊ शकतो.






