टोकियो : अनेक विवाहित पुरुष-महिलांचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) असल्याचे उघडकीस आले आहे. पण हे संबंध ऑफिसमध्येच असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा नोकरीवर गदा येऊ शकते. पूर्व चीनमधील झेजियांगस्थित कंपनीने (Zhejiang) कर्मचाऱ्यांना विवाहबाह्य संबंध ठेवण्यावर बंदी घातली आहे. या अटींचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास नोकरीवरून काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
चीनमधील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अगदी विचित्र नियम लागू केला आहे. ऑफिसमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं या कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने ‘विवाहबाह्य संबंध प्रतिबंध आदेश’ नावाने कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती नियमानुसार हा आदेश सर्व कर्मचाऱ्यांसाठी जारी केला आहे. या अटींचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे यामध्ये म्हटले आहे.
कामावर लक्ष राहावं म्हणून निर्णय
या कंपनीने आपल्या सर्व विवाहित कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे. 9 जून रोजी याबाबत आदेश जारी करण्यात आला होता. इंटर्नल मॅनेजमेंट सुधारण्यासाठी, वैवाहिक जीवनातील प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्यासाठी, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि कर्मचाऱ्यांचं कामावर अधिक लक्ष राहावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.