सौदी अरबिया : मुस्लीम धर्मासाठी पवित्र अशा हज यात्रेमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. मुस्लीम धर्मामध्ये हजयात्रेचे अनन्यसाधरण महत्त्व आहे. एकदा तरी व्यक्तीने हजयात्रा करावी असे मुस्लीम समाजामध्ये सांगितले जाते. मात्र सध्या सौदी अरबमध्ये उष्णेतेची लाट आली आहे. त्यांचा फटका यात्रेकरुना बसत असून उष्माखातामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे यामुळे 550 हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यावेळी झालेल्या मृतांमधील 323 भाविक हे इजिप्तचे नागरिक आहेत. यामुळे हज यात्रेवेळी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.
वातावरणामध्ये झपाट्याने बदल
अनेकभाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीचा गर्दी चेंगरून मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरबमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मक्केजवळील अल-मुसाइम येथील रुग्णालयाच्या शवागारातून मिळालेल्या माहितीनुसार उष्माघाताने 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सौदीमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बदलत्या हवामानामुळे वातावरणावर गंभीर परिणाम व बदल होत आहेत. तिथे सरासरी तापमान 0.4 अंशांनी वाढत आहे. सौदी राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात 51.08 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
स्थानिकांकडून पाणीवाटप
वाढत्या तापमानामुळे आणि झपाट्याने बदलत असलेल्या हवामानचा विपरित परिणाम हजयात्रेवर दिसून आले आहे. पाचशे भाविकांनी प्राण गमावल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सुमारे 2000 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. भाविकांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हज यात्रेकरु रांगेमध्ये डोक्यावर पाण्याचा सतत मारा करत आहेत. तसेच स्थानिकांकडून पाणी, आईस्क्रीम व कोल्ड ड्रिंक्सचे वाटप करत आहेत.