जपान, तैवाननंतर आता अमेरिकेला भूकंपाचे धक्के, 5.5 रिश्टर स्केल तिव्रता; जिवीतहानी नाही!

अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. न्यू जर्सी शहरात ५.५ रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला आहे.

    काही दिवसांपुर्वी जपानमध्ये भूकंपाचे धक्के (Earthquake in Japan) जाणवले. त्यानंतर तैवानमध्ये बुधवारी 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake In Taiwan )झाला. या भूंकपात 7 जणांनी आपला जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले. आता पुन्हा एका देशाला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आता अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के (Earthquake In America) जाणवले आहेत. न्यू जर्सी शहरात 5.5 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला आहे. पण त्याचे धक्के न्यूयॉर्क शहर, पेनसिल्व्हेनियासह अनेक ठिकाणी जाणवले आहेत.युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या मते, भूकंपाचे केंद्र न्यू जर्सी राज्य होते. पण शुक्रवारी न्यूयॉर्क शहर आणि पेनसिल्व्हेनियालाही छोटे भूकंप जाणवले. मात्र, यात कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही.

    अनेक इमारतीला हादरे

    भूकंपामुळे अमेरिकेतील अनेक शहरांना हादरे बसले. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. ब्रुकलिनमध्ये इमारती हादरल्या. येथे घरांचे कपाटाचे दरवाजे व काचा हादरल्या. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक इकडे-तिकडे धावू लागले. अनेक लोक त्यांच्या घरातून आणि अपार्टमेंटमधून बाहेर पडले. सभा आणि परिषदांमध्ये बराच वेळ गोंधळ सुरू होता. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी फिलाडेल्फियापासून न्यूयॉर्कपर्यंत आणि पूर्वेकडे लाँग आयलंडपर्यंत भूकंप जाणवल्याची नोंद केली. प्रत्येकजण सुरक्षित राहण्यासाठी आणि इतरांची स्थिती जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत राहिला.

    संयुक्त राष्ट्र संघाला पत्रकार परिषद थांबवावी लागली

    भूकंप झाला तेव्हा गाझामधील परिस्थितीबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद न्यूयॉर्कमधील मुख्यालयात पत्रकार परिषद घेत होती. त्याचवेळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने पत्रकार परिषद काही काळ थांबवण्यात आली.