Photo credit : Social media
टाटा समूहाने वाहन व्यवसायासाठी महत्त्वाकांक्षी विकास आराखडा जाहीर करत आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहन व्यवसायांचे विभाजन झाल्यानंतर समूहाने चारही वाहन व्यवसायांसाठी स्वतंत्र वाढीची रणनीती आखली आहे. ही माहिती समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
चंद्रशेखरन यांच्या मते, 2031 पर्यंतच्या 100 अब्ज डॉलर्स महसुलापैकी Jaguar Land Rover (JLR) कडून 45 ते 50 अब्ज डॉलर्स, तर व्यावसायिक वाहन व्यवसायातून सुमारे 40 अब्ज डॉलर्स महसूल अपेक्षित आहे. उर्वरित महसूल प्रवासी वाहन आणि ऑटो कंपोनंट्स व्यवसायातून मिळेल.
टाटा मोटर्स भारतातील व्यवसायात सुमारे 4 ट्रिलियन रुपये गुंतवणार असून, यूकेस्थित JLR पुढील पाच वर्षांत 20 अब्ज पाउंड गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक नवीन उत्पादने, विद्युतीकरण (Electrification), उत्पादन क्षमता वाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरली जाणार आहे.
Skoda Auto फॉक्सवॅगन इंडियामध्ये मोठे बदल! पियूष अरोरा यांच्याकडे सोपवली ‘ही’ अतिरिक्त मोठी जबाबदारी
टाटा मोटर्सने 2031 पर्यंत भारतीय प्रवासी वाहन बाजारातील आपला हिस्सा 14.2 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी कंपनी 6 नवीन मॉडेल्स आणि 20 हून अधिक प्रॉडक्ट रिफ्रेशेस बाजारात आणणार आहे. कंपनीने पुनरागमन केलेल्या Tata Sierra मॉडेलकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. चंद्रशेखरन यांच्या मते, Sierra भविष्यात टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक ठरू शकते.
भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारात सुमारे 45 टक्के हिस्सा असलेल्या टाटा मोटर्सने विविध किंमत श्रेणींमध्ये नवीन EV मॉडेल्स सादर करून आपले नेतृत्व कायम ठेवण्याची योजना आखली आहे.
Nissan Tekton : ‘वन कार, वन वर्ल्ड’ संकल्पनेत आणली नवीन गाडी! भारतात झाली लाँच, फीचर्समध्ये A1
टाटा समूहाची बॅटरी उत्पादक कंपनी Agratas Ltd. 2027 पासून उत्पादन सुरू करणार आहे. ही कंपनी JLR आणि Tata Motors या दोन्ही कंपन्यांना स्थानिक पातळीवर बॅटरीचा पुरवठा करणार असून, त्यामुळे EV उत्पादन खर्च कमी करण्यास आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत होणार आहे. टाटा समूहाची ही दीर्घकालीन रणनीती इलेक्ट्रिक वाहनं, लक्झरी कार, व्यावसायिक वाहनं आणि आधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक वाहन उद्योगात आपले स्थान अधिक मजबूत करण्यावर केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले आहे.






