Ebola Crisis Congo : काँगोत इबोलाचा उद्रेक! १,७०० हून अधिक बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; युगांडातही पसरला प्रादुर्भाव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Ebola outbreak Democratic Republic of Congo : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि मध्य आफ्रिकेच्या आसपासच्या भागांमध्ये ‘इबोला’ (Ebola Virus) विषाणूच्या प्रादुर्भावाने अत्यंत भयानक रूप धारण केले आहे. ताज्या अहवालानुसार, काँगोमध्ये आतापर्यंत तब्बल १,७९२ लोकांना इबोलाचा संसर्ग झाला असून, ६२५ निरपराध लोकांचा यात मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संयुक्त राष्ट्रांनी (UN) आंतरराष्ट्रीय समुदायाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले असून, हा प्रादुर्भाव अत्यंत विनाशकारी वळणावर असल्याचा इशारा दिला आहे.
या भीषण साथीची अधिकृत घोषणा १५ मे रोजी करण्यात आली होती. काँगोमधील इतुरी (Ituri) प्रांत या साथीचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र, हा विषाणू आता केवळ एका प्रांतापुरता मर्यादित राहिलेला नसून, शेजारील इतर प्रांतांमध्येही वेगाने पाय पसरत आहे. काँगोमधील अंतर्गत संघर्ष, राजकीय अस्थिरता आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे विस्थापन यामुळे या धोकादायक रोगाचा प्रसार रोखणे आरोग्य यंत्रणांसाठी कठीण बनले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे आपत्कालीन मदत समन्वयक टॉम फ्लेचर यांनी सांगितले की,
“इबोलाचा कणा मोडण्यासाठी जगाला आता अत्यंत वेगाने आणि एकत्रितपणे काम करावे लागेल. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iron Dome India: भारताचे संरक्षण कवच आणखी मजबूत; इस्रायलची ‘Rafael’ कंपनी भारतात सुरू करणार ‘आयर्न डोम’ प्रोजेक्ट
काँगोचे आरोग्य मंत्री सॅम्युअल रॉजर काम्बा यांनी बुनिया येथे पत्रकारांशी बोलताना या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले,
“इबोलाचा हा उद्रेक सध्या अत्यंत सक्रिय टप्प्यात आहे. शहरातील लोकसंख्येची उच्च घनता आणि स्थानिक भौगोलिक घटकांमुळे सामान्य जनतेचे संरक्षण करणे एक मोठे आव्हान बनले आहे. ही महामारी नेमकी कधी शिखरावर (Peak) पोहोचेल, याचा अंदाज लावणे सध्या अत्यंत घाईचे ठरेल.”
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या ७६४ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये किंवा विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, तर २९५ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या आजाराचा एकूण मृत्यूदर ३४.१ टक्के एवढा उच्च असल्याने प्रशासकीय वर्गात खळबळ उडाली आहे.
हा प्राणघातक विषाणू केवळ काँगो देशापुरता मर्यादित राहिलेला नाही. शेजारील देश युगांडामध्येही इबोलाची २० बाधित प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे पूर्व आणि मध्य आफ्रिकेतील सर्वच देशांच्या सीमांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
टॉम फ्लेचर यांनी स्पष्ट केले की, हे संकट केवळ एका सार्वजनिक आरोग्य आणीबाणीपुरते मर्यादित राहिलेले नाही. इबोला संकट येण्यापूर्वीच काँगोमधील लाखो नागरिक गरिबी, उपासमार, सशस्त्र संघर्ष आणि विस्थापनाचा सामना करत आहेत. त्यातच येथील कमकुवत पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FIFA: फुटबॉल चाहते संतप्त! फ्रान्सकडून मोरोक्कोचा पराभव झाल्यानंतर लंडनमध्ये उसळला हिंसाचार, पाहा VIRAL VIDEO
संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) काँगो प्रशासनाच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. युएनने बाधित क्षेत्रांमध्ये मानवतावादी कार्यकर्त्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवेश देण्याची मागणी सर्व संबंधित पक्षांकडे केली आहे. तसेच, अत्यावश्यक वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा आणि पुरवठा मार्ग खुले ठेवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय देणगीदारांनी त्वरित निधी उपलब्ध करून न दिल्यास हा उद्रेक जागतिक पातळीवर डोकेदुखी ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.






