Ice batteries : विज्ञानाची मोठी झेप! आता बर्फ करणार वीज बिल कमी; का म्हटले जातेय 'या'ला एक क्रांतिकारी शोध? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बर्फाच्या बॅटरींमुळे वीज बिलात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत शक्य.
पर्यावरणीय हानी कमी करून थंड हवेचा शाश्वत पर्याय उपलब्ध.
मोठ्या इमारतींपासून आता लहान घरांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचत आहे.
Ice battery cooling : आजच्या युगात एसीशिवाय जगणं अवघड झालं आहे. उन्हाळ्यातली असह्य उकाडा असो वा ऑफिसच्या बंदिस्त खोल्यांतील घुसमट थंड हवा ही आता चैनीपेक्षा जास्त, गरज बनली आहे. मात्र या थंड हवेसाठी आपण प्रचंड किंमत मोजतो. पहिली किंमत म्हणजे सतत वाढत जाणारी वीज बिले. दुसरी किंमत पॉवर ग्रिडवर वाढणारा ताण. आणि तिसरी सर्वात मोठी किंमत म्हणजे पर्यावरणाचं नुकसान. एसी हे जगातील वीज वापराचं मोठं कारण मानलं जातं आणि त्यामुळे वाढणाऱ्या जागतिक तापमानवाढीला आणखी गती मिळते. पण प्रश्न असा आहे की आपण थंड हवेला मुकता मुकता पर्यावरण वाचवू शकतो का? आणि त्याचवेळी आपल्या खिशालाही दिलासा देऊ शकतो का? याचं उत्तर आहे हो! आणि ते उत्तर म्हणजे “बर्फाच्या बॅटरी“.
ही बॅटरी नेहमीसारखी विजेची बॅटरी नाही. उलट, ती साधं पाणी वापरते. तंत्रज्ञान अगदी सोपं आहे रात्री, जेव्हा विजेची मागणी कमी असते, तेव्हा ही बॅटरी वीज वापरून पाणी गोठवते. सकाळी आणि दिवसा, जेव्हा उन्हाचा तडाखा आणि एसीचा वापर सर्वाधिक असतो, तेव्हा हा तयार केलेला बर्फ वितळवून इमारतींमध्ये थंडावा निर्माण करते. त्यामुळे दिवसभर थेट एसी चालवण्याची गरज कमी होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gold Card Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी $1 दशलक्षला विकत घेतले ‘गोल्ड कार्ड’; पाहा ‘या’ योजनेचा का होतोय इतका गाजावाजा?
हे समजून घेऊया काही महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये:
१. मोठी बचत: आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी सांगते की एखादी इमारत तिच्या विजेच्या २०% फक्त थंड होण्यासाठी खर्च करते. बर्फाच्या बॅटरी हा खर्च एकतृतीयांशपर्यंत घटवू शकतात.
२. हवामानासाठी हितकारक: उन्हाळ्यात सर्वजण एसी चालवतात तेव्हा वीज कंपन्यांना महागडे आणि प्रदूषणकारी पीकर प्लांट चालवावे लागतात. बर्फाच्या बॅटरीमुळे हा दबाव कमी होतो, त्यामुळे पर्यावरणाचा बचाव होतो.
३. टिकाऊ उपाय: लिथियम-आयन बॅटरी वेळेनुसार खराब होतात. पण पाणी वारंवार गोठवून व वितळवून वापरता येतं. फक्त पंप व व्हॉल्व्ह यांची देखभाल पुरेशी असते.
४. परवडणारी किंमत: कंपन्यांच्या मते, दीर्घकाळात बर्फाच्या बॅटरी या लिथियम बॅटरीपेक्षा निम्म्या खर्चात टिकतात.
Scientists find that ice generates electricity when bent.
A new study reveals that ice is a flexoelectric material, meaning it can produce electricity when unevenly deformed. This discovery could have major technological implications while also shedding light on natural… pic.twitter.com/du3R0Nk85o
— Massimo (@Rainmaker1973) September 3, 2025
credit : social media
हे तंत्रज्ञान आधीच अमेरिकेत लोकप्रिय होत आहे. न्यू यॉर्कमधील एका बँकेच्या इमारतीत, पार्किंगच्या आकाराच्या १०० टाक्यांमध्ये दररोज इतका बर्फ तयार होतो की त्यातून ३० लाख “मार्गेरिटा” पिझ्झे थंड केले जाऊ शकतात! कॅलिफोर्नियामध्ये तर “नोस्ट्रोमो एनर्जी” नावाची कंपनी त्यांच्या “आइस ब्रिक” सिस्टीमद्वारे १९३ इमारतींमध्ये हे तंत्रज्ञान बसवण्याच्या तयारीत आहे. “ट्रेन टेक्नॉलॉजीज”सारख्या कंपन्यांचा दावा आहे की त्यांच्या आइस बॅटरी सिस्टीममुळे कूलिंगचा खर्च तब्बल ४०% पर्यंत कमी होऊ शकतो.
हे तंत्रज्ञान अजून अधिक कार्यक्षम कसं करता येईल यावरही प्रयोग सुरू आहेत. टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मीठ हायड्रेट्सचा वापर करून एक प्रयोग केला. पाण्यात मिसळलेल्या काही क्षारांच्या मदतीने गोठवणं अधिक सोपं आणि टिकाऊ होतं. बेरियम मिसळल्याने फेज सेग्रीगेशन (जेव्हा मीठ आणि पाणी वेगळं होतं) ही मोठी समस्या कमी झाली. परिणामी, या बॅटऱ्या अधिक काळ टिकतात आणि एसी सिस्टीमशी एकत्रिकरणही सोपं होतं.
आतापर्यंत बर्फाच्या बॅटऱ्या फक्त ऑफिस टॉवर, रुग्णालयं, मॉल्स आणि हॉटेल्समध्येच बसवल्या जात होत्या. कारण त्यांचा आकार मोठा होता. मात्र आता “आइस बेअर” आणि “आइस क्यूब”सारखे छोटे मॉडेल्स उपलब्ध आहेत, जे घरांमध्ये किंवा लहान दुकांनात बसवता येतात. हे नक्कीच आशादायक आहे. तथापि, काही आव्हानं अजूनही आहेत. उदा. थंड हवामान असलेल्या भागात एसीची मागणी कमी असल्याने खर्च वसूल करणं कठीण ठरतं. त्याचप्रमाणे, जिथे वीज कंपन्या दिवसभर एकाच दराने वीज विकतात तिथे या बॅटरी फारसा फायदा दाखवू शकत नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Drug War : ट्रम्पची ‘ही’ एक विचारपूर्वक खेळी; व्हेनेझुएलाजवळ अमेरिकन सैन्याने उडवले तिसरे जहाज, पहा VIDEO
वाढत्या वीज किमती, हवामान बदल, आणि टिकाऊ उर्जेची गरज या तिघांच्या संगमातून बर्फाच्या बॅटरी हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने “गेम चेंजर” ठरू शकतं. आज हे तंत्रज्ञान मोठ्या इमारतींपुरतं मर्यादित असलं, तरी लवकरच हे घराघरांत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्पना करा उद्या आपल्या घरातल्या एसीसाठी जास्त वीज बिल न येता, आपण थंडावा आणि पर्यावरण संरक्षण दोन्ही मिळवू शकणार आहोत. बर्फ, जो आपण उन्हाळ्यात पेय थंड करण्यासाठी वापरतो, तोच बर्फ उद्या आपल्या खिशालाही थंडावा देणार आहे!