पृथ्वीच्या गाभ्यात सुमारे ३० अब्ज टन सोने असल्याचा अंदाज; शास्त्रज्ञांचा थक्क करणारा शोध ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
30 billion tons gold Earth’s core : आपण अनेकदा ऐकलं असेल की पृथ्वी अमूल्य संपत्तीने भरलेली आहे. समुद्र, डोंगर, खनिजसंपत्ती आणि धातू यांचा प्रचंड साठा पृथ्वीच्या गर्भात दडलेला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पृथ्वीच्या गाभ्यात अब्जावधी टन सोन्याचा खजिना लपलेला आहे? आणि आश्चर्य म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी या सोन्याचे अगदी सूक्ष्म कण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. हा धक्कादायक खुलासा जर्मनीच्या गॉटिंगेन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला असून, त्यांच्या संशोधनाने विज्ञानविश्वात खळबळ माजवली आहे.
संशोधनानुसार, पृथ्वीच्या गाभ्यात सुमारे ३० अब्ज टन सोने असल्याचा अंदाज आहे. या सोन्याची किंमत जवळपास २.७७ ट्रिलियन युरो इतकी प्रचंड आहे. मात्र, या खजिन्यापर्यंत माणसाचा हात पोहोचणे सध्या अशक्यच आहे. कारण पृथ्वीचा गाभा हा सर्वात खोल आणि कठीण स्तर आहे. यातून फक्त अगदी लहानसा अंशच बाहेर येतो. जणू काही पृथ्वी आपल्या गाभ्यातील संपत्तीची सूक्ष्म झलक आपल्याला दाखवत असते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा
शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा आतल्या थरातून बाहेर येणाऱ्या लाव्यासोबत सोने, रुथेनियम आणि इतर मौल्यवान धातूंचे सूक्ष्म कण बाहेर पडतात. याच संशोधनासाठी गॉटिंगेन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हवाईतील किलौथा आणि लोइही ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाहेर पडलेल्या लाव्याचा सखोल अभ्यास केला. त्यात सोन्याचे आणि रुथेनियमचे सूक्ष्म कण सापडले. म्हणजेच ज्वालामुखी हा पृथ्वीच्या गाभ्यातून बाहेर पडणाऱ्या मौल्यवान धातूंचा खरा दरवाजा ठरतो.
संशोधकांनी महासागरातील बेटांवर आढळणाऱ्या बेसाल्ट खडकांचा अभ्यास केला. हे खडक पृथ्वीच्या गर्भातून वर येणाऱ्या गरम धातूच्या थरांपासून (plumes) बनलेले असतात. या खडकांमध्ये रुथेनियम धातू आढळला, जो पृथ्वीच्या गाभ्याचा थेट पुरावा मानला जातो. लाव्यामध्ये आढळणाऱ्या 100Ru समस्थानिकांची (isotopes) उच्च पातळी हे दर्शवते की पृथ्वीच्या गाभ्याचा ०.३% पेक्षा कमी भाग पृष्ठभागापर्यंत पोहोचतो. पूर्वी शास्त्रज्ञांना वाटत होतं की पृथ्वीचा गाभा पूर्णपणे वेगळा आहे आणि त्याचा वरच्या थरांशी काहीही संबंध नाही. पण या संशोधनामुळे हा समज चुकीचा ठरला आहे.
आजच्या घडीला पृथ्वीच्या गाभ्यातून थेट सोने किंवा इतर धातू काढणं तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे शक्य नाही. गाभ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात मोठे आव्हान. पण या संशोधनामुळे आपल्याला पृथ्वीची रचना, तिच्यातील नैसर्गिक प्रक्रिया आणि अब्जावधी वर्षांपासून सुरू असलेला निसर्गाचा ‘सोनेरी खेळ’ समजून घेण्याची नवी दिशा मिळाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PutinXiHotMic : माणूस अमर होणार? पुतिन-जिनपिंग मानवाला 150 वर्षे जिवंत ठेवणार, जाणून घ्या कसे
सोने हे फक्त दागिन्यांपुरतं किंवा चलनपुरतं मर्यादित नाही. ते पृथ्वीच्या जन्मकाळाशी, तिच्या रचनेसह जोडलेलं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी बाहेर येणारे सोन्याचे सूक्ष्म कण हे त्या गाभ्यातील अब्जावधी टन खजिन्याचे संदेशवाहक आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, “आपण येथे ढेकूळांबद्दल बोलत नाही आहोत, तर अगदी सूक्ष्म खुणांबद्दल बोलत आहोत.” हाच तो ‘सोनेरी पुरावा’, ज्यामुळे पृथ्वीच्या आत दडलेला गूढ खजिना समजण्यास मदत होते. गॉटिंगेन विद्यापीठाच्या या संशोधनामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पृथ्वीच्या गाभ्यात अफाट संपत्ती दडलेली आहे, आणि आपण तिच्या फक्त सूक्ष्म झलकाच पाहतो. कदाचित भविष्यातील तंत्रज्ञान या खजिन्यापर्यंत पोहोचेल, पण सध्यासाठी हा शोध म्हणजेच एक सोनेरी रहस्यकथा आहे.