मोसादचा खेळ खल्लास, तेल अवीवमधील मुख्यालय उडवलं; इराणचा मोठा दावा
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध अत्यंत धोकादायक मोडवर पोहोचलं आहे. दोन्ही देशांच्या राजधानीत भीतीदायक सायरन वाजतायेत, क्षेपणास्त्र डागली जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान दोन्ही देशांकडून गुप्तचर संस्थांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलची लष्करी गुप्तचर संस्था आणि मोसादचे ऑपरेशन सेंटर नष्ट केल्याचा दावा केला आहे.
G -7 Summit : काय आहे G-7? कसं चालतं काम? भारत सदस्य नसताना दरवेळी आमंत्रण का? वाचा सविस्तर
इराणच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, IRGC ने मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे इस्रायलची सर्वात शक्तिशाली एजन्सी मोसादचा ऑपरेशनल बेस उडवून दिला. इस्रायली मिलिटरी इंटेलिजेंस डायरेक्टरेटवरही (अमान) हल्ला केल्याचा दावाही करण्यात आला आहे. युद्धाच्या दरम्यान इस्रायलला कमकुवत करण्यासाठी आणि त्याची गुप्तचर शक्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
इराणचा दावा आहे की हा क्षेपणास्त्र हल्ला तेल अवीवमध्ये करण्यात आला आहे. तेल अवीवमध्ये मोसादचा एक प्रमुख तळ होता. मात्र या हल्ल्याबद्दल इस्रायलकडून अधिकृतपणे कोणतीही पुष्टी मिळालेली नाही, परंतु सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये तेल अवीवमधील स्फोटांनंतर धुराचे ढग दिसत होते. इराणने याला आमचं प्रत्युत्तर असं म्हटलं आहे.
या हल्ल्यावर इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु जर मोसादवरील हल्ला यशस्वी झाला तर इस्रायलच्या गुप्तचर क्षमतेला मोठा धक्का ठरू शकतो, अशी भीती रक्षातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि युरोपीय देश या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक देशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केलं आहे.
इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष आता केवळ मर्यादित लष्करी कारवाई राहिलेला नाही, तर तो गुप्तचर संस्था आणि राजधानी शहरांवर केंद्रित युद्ध बनला आहे. जर परिस्थिती सामान्य झाली नाही तर हा संघर्ष एका व्यापक प्रादेशिक युद्धात बदलू शकतो, ज्यामध्ये अमेरिका, रशिया आणि इतर अनेक देशांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका दिसून येण्याची शक्यता आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण हल्ला केल्यानंतर या संघर्षाला तोंड फूटलं आहे.