Iran-Israel War : इराण-इस्त्रायल देशांच्या संघर्षादरम्यानच अमेरिकेचं मोठं पाऊल; इंधन देणारी टँकर विमानं... (File Photo)
तेल अवीव : इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील सुरू असलेला लष्करी संघर्ष आता धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले चौथ्या दिवशीही सुरू आहेत. असे असतानाच आता अमेरिकेची लढाऊ विमानांना इंधन देणारी 28 टँकर विमाने एकाच वेळी आखाती देशांकडे झेपावली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे.
इस्रायलची पाठराखरण करणाऱ्या अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका USS निमित्झने सोमवारी सकाळी मध्य पूर्वेकडे म्हणजेच अरबस्तानाकडे प्रस्थान केलं. अमेरिकेची ही युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातून तैनात करण्यात आली होती. व्हिएतनाममधील डानांग शहरात होणारा निमित्जचा नियोजित पोर्ट कॉल आणि त्यासाठीचा स्वागत समारंभ अचानक रद्द करण्यात आला, त्यावेळी या हालचाली समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात USS निमित्ज कॅरियर स्ट्राईक ग्रुपने दक्षिण चीन सागरात समुद्री सुरक्षा मोहिमा पार पाडल्या होत्या.
दरम्यान, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेला लष्करी संघर्ष आता धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले चौथ्या दिवशीही सुरू आहेत. इराणचे 30 टक्के क्षेपणास्त्र लाँचर नष्ट केल्याचा दावा इस्त्रायलच्या सैन्याने केला आहे.
इस्त्रायल विजयाच्या मार्गावर
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश विजयाच्या मार्गावर आहे. त्यांनी इस्त्रायली सैन्याच्या तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. इराणमध्ये आतापर्यंत 224 जणांचा मृत्यू झाला आहे. नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ आणि चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांच्यासमवेत मध्य इस्रायलमधील टेल नोफ एअरबेसला भेट देताना हे विधान केले.