सात दिवसाच्या युद्धविरामानंतर इस्रायलचं गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन पुन्हा सुरू

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज संपुष्टात आला आहे. इस्रायली लष्कर IDF ने म्हटले आहे की, हमासने युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे, त्यानंतर गाझामध्ये त्यांचे ग्राउंड ऑपरेशन पुन्हा सुरू केले आहे.

  इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आता संपुष्टात आला आहे. इस्रायली लष्कराने आपल्या X खात्यावरील पोस्टद्वारे म्हटले आहे की हमासने युद्धविरामाचे उल्लंघन करून इस्रायली हद्दीत गोळीबार केला आहे. यानंतर, आयडीएफने गाझामध्ये हमासच्या विरोधात आपले ग्राउंड ऑपरेशन पुन्हा सुरू केले आहे. IDF ने सांगितले की आज किबुत्झ हॉलिटमध्ये एक अलर्ट सक्रिय करण्यात आला आणि त्याचे पुनरावलोकन केले जात आहे.

  ७ दिवस चालली युद्धबंदी

  इस्रायल आणि हमास यांच्यातील  युद्धविराम करार 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालला होता आणि यादरम्यान दोन्ही बाजूंनी लोकांना सोडण्यात आले होते. युद्धबंदी लागू करण्यात कतार आणि अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली.

  ५० हून अधिक ओलिसांची सुटका

  इस्रायल आणि हमासच्या युद्धविराम अंतर्गत हमासने गेल्या एका आठवड्यात 75 हून अधिक ओलीसांची सुटका केली आहे. त्याबदल्यात इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केली. कतारने केलेल्या युद्धविराम अंतर्गत, अनेक परदेशी नागरिकांना हमासने सोडले.

  7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासच्या सैनिकांनी सुमारे 240 लोकांना ओलीस ठेवले होते. या हल्ल्यात 1400 लोक मारले गेले होते. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझावर हल्ला करून 15,000 हून अधिक लोक मारले. कतारच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा कालावधी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आला.