Balochistan army convoy attack : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात कराची-क्वेट्टा महामार्गावर सोमवारी एक अत्यंत भीषण आणि रक्तरंजित बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात पाकिस्तानी लष्कराचे ३२ सैनिक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला लष्कराच्या ताफ्यावर ‘व्हेईकल बॉर्न इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस’ (VBIED) च्या साहाय्याने करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांसाठी ही अत्यंत मोठी शर्मनाक घटना ठरली आहे.
तीन वाहने उडवली, एकामध्ये कुटुंबीयही होते
घटनास्थळावर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाक लष्कराच्या आठ वाहनांचा ताफा कराचीहून क्वेट्टा दिशेने जात होता. झिरो पॉइंटजवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये स्फोटके लपवण्यात आली होती. लष्करी ताफा त्या ठिकाणी पोहोचताच ती कार स्फोटाने उडवण्यात आली. एकाच वेळी तीन वाहनांवर परिणाम होईल अशा प्रकारे हा स्फोट नियोजित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, हल्ल्यात बाधित झालेल्या वाहनांपैकी एक लष्करी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणारी बस होती. त्यामुळे मृतांचा आकडा अधिक भीषण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत घटनास्थळावरून ३२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेक जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून माहिती दडपण्याचा आरोप
घटनेनंतर पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांवर तीव्र टीका होत आहे. अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकारी या घटनेला ‘स्कूल बस’वरील हल्ला असल्याचा बनाव रचत आहेत, ज्यामध्ये सामान्य निष्पाप मुले आणि शिक्षक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मागे उद्देश स्पष्ट आहे – लष्कराची सुरक्षा प्रणाली किती अकार्यक्षम आहे, हे दडपून ठेवण्याचा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लोकांना मारण्यासाठी धर्माचा वापर केला…’ बहरैनमध्ये असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानवर पुन्हा कडाडले
दहशतवादी गटांचा संशय, बलुच फुटीरतावाद्यांची छाया
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही, मात्र बलुचिस्तानमधील फुटीरतावादी गटांवर संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रदेश पूर्वीही लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध राहिला आहे. बलुच स्वातंत्र्य लढ्यात गुंतलेल्या गटांनी यापूर्वी अनेक वेळा लष्करी ताफ्यांवर हल्ले केले आहेत.
दहशतीचं सावट : दुसऱ्या हल्ल्याचीही नोंद
या हल्ल्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी, २१ मे रोजी बलुचिस्तानमधील खुजदार भागातही क्वेट्टा-करेची महामार्गावर आर्मी पब्लिक स्कूलच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात पाच निष्पाप मुले आणि एक चालक ठार झाला होता. त्यामुळे या मार्गावरचे हल्ले ही आता साखळी स्वरूपात घडणारी मालिका बनली आहे.
पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेच्या यंत्रणांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बलुचिस्तानमधील अस्थिरता, वाढता फुटीरतावाद, आणि लष्कराविरुद्धचा रोष यांचा एकत्रित स्फोट या घटनेत झाला आहे, असे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, बलुचिस्तानसारख्या संवेदनशील भागात आजही पाकिस्तानी लष्कर सुरक्षित नाही, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशियाने ओबामा प्रशासनाच्या काळात तंत्रज्ञान चोरले…’ डोनाल्ड ट्रम्पची पुन्हा बोलबच्चनगिरी, काय सत्य?
दहशतवादाचा विपरित फटका पाकिस्तानवरच
पाकिस्तानने ज्या दहशतवादी गटांना एकेकाळी आश्रय दिला, त्याच गटांचे पाशविक चक्र आता देशावर उलटले आहे. कराची-क्वेट्टा महामार्गावरील ही घटना केवळ लष्करावरचा हल्ला नसून, पाकिस्तानच्या सुरक्षात्मक व्यवस्थेचे अपयश आणि फुटीर शक्तींच्या वाढत्या प्रभावाचे लक्षण आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, जनतेमध्ये लष्कराच्या भूमिकेवर असंतोषही वाढू लागला आहे.