G-7 शिखर परिषदेतून पाकिस्तानवर मोदींचा घणाघात; दहशतवादावर घेतली ठाम भूमिका ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
PM Narendra Modi G7 Summit: कॅनडाच्या कानानस्किसमध्ये पार पडलेल्या G-7 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसमोर पाकिस्तानवर थेट टीका करत स्पष्ट शब्दांत दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडली. “दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे आणि जो देश दहशतवादाला पाठिंबा देतो, त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल,” असे ठाम शब्दांत मोदींनी म्हटले.
G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी १७ जूनला कॅनडाच्या कानानस्किस येथे दाखल झाले. या परिषदेदरम्यान त्यांनी दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केल्या. पण या सर्व भेटींच्या पलीकडे, मोदींचे भाषण विशेष गाजले ते त्यांच्या पाकिस्तानविरोधी स्पष्ट भूमिकेमुळे.
G-7 आउटरीच सत्रात बोलताना पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. “हा हल्ला केवळ पहलगामवरील नव्हता, तर तो प्रत्येक भारतीयाच्या आत्म्यावरील, ओळखीवरील आणि प्रतिष्ठेवरील आक्रमण होता. ही मानवतेवरची थेट चिथावणी होती,” असे मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “दहशतवाद हे लोकशाही, शांतता, आणि मानवतेच्या मूल्यांना आव्हान देणारे आहे. आपल्याला याबाबत कोणताही गोंधळ न ठेवता स्पष्ट धोरण आणि भूमिका घ्यावी लागेल. जो कोणी देश दहशतवादाला उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतो, त्याला याची किंमत चुकवावी लागेल. दुटप्पी धोरणांनी जगात स्थैर्य येणार नाही.”
हे देखील वाचा : International Picnic Day 2025: या दिवसाची सुरुवात कशी झाली? पिकनिकसाठी ‘ही’ ठिकाणे आहेत परिपूर्ण
मोदींनी केवळ दहशतवादावरच नव्हे, तर ‘ग्लोबल साउथ’मधील देशांच्या अडचणींवरही भाष्य केले. ते म्हणाले, “ग्लोबल साउथमधील देश अनेक संकटांशी सामना करत आहेत. अन्न, इंधन, खत व आर्थिक संसाधनांच्या टंचाईचा सर्वाधिक फटका याच देशांना बसतो. जागतिक स्थैर्याच्या चर्चेत त्यांचा आवाजही समोर आणणे, ही भारताची जबाबदारी आहे.” या वक्तव्याने भारताने स्वतःला केवळ एक प्रादेशिक नेता म्हणून नव्हे, तर ‘ग्लोबल साउथ’चा प्रवक्ताही म्हणून मांडले.
G-7 परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी औपचारिक स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंबंधी ‘X’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, “जागतिक सहकार्य आणि प्रगतीसाठी पूल बांधण्याची संधी. पंतप्रधान मोदी यांचे कॅनडामध्ये स्वागत.”
Fully agree with you, PM Giorgia Meloni. India’s friendship with Italy will continue to get stronger, greatly benefitting our people!@GiorgiaMeloni https://t.co/LaYIIZn8Ry
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025
credit : social media
मोदींचे G-7 शिखर परिषदेमधील हे भाषण केवळ पाकिस्तानविरोधी चेतावणी नव्हते, तर भारताची वाढती जागतिक भूमिका, स्पष्ट परराष्ट्र धोरण, आणि ग्लोबल साउथसाठीची बांधिलकी यांचे प्रतिबिंब होते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, जपान, इटली आणि कॅनडा या सात शक्तिशाली देशांच्या G-7 समूहात भारत हा सदस्य नसला तरी, आउटरीच सत्रांद्वारे भारताची उपस्थिती सातत्याने वाढत आहे.
हे देखील वाचा : Viscacha : किती गोड! दक्षिण अमेरिकेतील आळशी दिसणारा, पण साहसी आणि कणखर असा ‘हा’ गोंडस छोटा प्राणी
पंतप्रधान मोदींनी G-7 परिषदेतून दिलेला संदेश केवळ पाकिस्तानसारख्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर रोष व्यक्त करणारा नव्हता, तर संपूर्ण जगाला उद्देशून होता. दहशतवाद, दुटप्पी धोरणं आणि अनिश्चिततेच्या काळात भारताचा ठाम, पारदर्शक आणि मानवतावादी दृष्टिकोन स्पष्टपणे मांडणारा हा संदेश जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा अधिक उंचावणारा ठरला.