'या' देशांसाठी Multiple Visa Entry बंद; हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचा निर्णय(फोटो सौजन्य: iStock/ सोशल मीडिया)
रियाध: सौदी अरेबियाने व्हिसा नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असून 14 देशांसाठी मल्टीपल व्हिसा एन्ट्री बंद करण्यात आली आहे. या 14 देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश आहे. सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. हज यात्रेत अनअधिकृतपणे येणाऱ्या लोकांवर रोख लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून 1 फेब्रुवारी 2025 पासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
या नव्या नियमांनुसार, आता या देशांतील प्रवाशांना फक्त सिंगल-एंट्री व्हिसा मिळणार असून हा फक्त ३० दिवसांसाठी वैध असणार आहे. अनेक प्रवासी मल्टीपल-एंट्री व्हिसाचा वापर करून हज यात्रा करतात, यामुळे अधिकृत परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत होती. 2024 मध्ये ही समस्या अत्यंत गंभीर झाली होती. गर्दीमुळे आणि प्रचंड उष्णतेमुळे 1200 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यामुळे हज व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि अनधिकृत प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
या देशांवर होणार परिणाम
या यादीत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, इजिप्त, अल्जीरिया, इराक, जॉर्डन, मोरक्को, नायजेरिया, इथिओपिया, ट्युनिशिया, सूडान आणि यमन या १४ देशांच्या प्रवाशांचा समावेश असून परिणाम होण्याची शक्यता आहे. याआधी या देशांच्या नागरिकांना पर्यटन, व्यवसाय आणि कौटुंबिक भेटींसाठी एक वर्षाचा मल्टीपल-एंट्री व्हिसा मिळत असे, पण आता मल्टीपल व्हिसा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यामुळे हज यात्रेचे नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल असे सौदी अधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे.
काय आहेत नवीन नियम?
नवीन नियमांनुसार, 14 देशांतील नागरिकांना आता फक्त सिंगल-एंट्री व्हिसासाठी अर्ज करता येईल, तसेच हा व्हिसा 30 दिवसांसाठी वैध असणार असून याचा कालावधी वाढवता येणार नाही. हज, उमरा, राजनयिक आणि निवासी व्हिसावर मात्र याचा परिणाम होणार नाही. सौदी अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे अनधिकृत हज प्रवाशांना रोखता येईल आणि अधिकृत यात्रेकरूंना अधिक सोयीस्कर अनुभव मिळेल.
भारतावर होणारा परिणाम
सौदी अरेबियामध्ये दरवर्षी हजारो भारतीय नागरिक विविध कारणांसाठी प्रवास करतात, यामध्ये व्यवसाय, नोकरी, धार्मिक यात्रा आणि कौटुंबिक भेटी यांचा समावेश असतो. मल्टीपल-एंट्री व्हिसा बंद झाल्यामुळे भारतीय प्रवाशांना वारंवार सौदी अरेबियाला जावे लागल्यास प्रत्येक वेळी नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढणार आहेत.
सौदी अरेबिया प्रत्येक देशासाठी हज यात्रेकरूंची एक मर्यादा निश्चित करतो. मात्र, अनेक प्रवासी पर्यटक व्हिसाचा गैरवापर करून अधिकृत संख्येपेक्षा जास्त प्रमाणात हज करत होते, यामुळे प्रशासनाला मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र, या निर्णयामुळे हज प्रवास अधिक नियंत्रित होईल, मात्र व्यावसायिक आणि व्यक्तिगत प्रवास करणाऱ्यांसाठी हा नियम अडचणीचा ठरू शकतो.