तालिबानचे उपपरराष्ट्रमंत्री शेर मोहम्मद अब्बास यांचा पाकिस्तानला इशारा( फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
इस्लामाबाद: पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्यात दिर्घकाळापासून सीमावाद सुरु आहे. अलीकडील काळातहा वाद आणखी चिघळला आहे. पाकिस्तानने अलीकडे अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करुन हवाई हल्ले केले. या हल्ल्यात अनेक तालिबानी लढवय्यांचा मृत्यू झाला. यानंतर अफगाणिस्तानने प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. तसेच पुन्हा एकदा तालिबानने पाकिस्तानला धमकी दिली आहे की, त्यांनी हल्ले थांबले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील.
तालिबान विरोधात पाकिस्तानची कठोर भूमिका
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तालिबानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे, की, तालिबानला संपविण्याशिवाय पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉरवर कब्जा करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे, यामुळे तालिबानने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तालिबान केला भारताचा उल्लेख
तालिबानचे उप-परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास यांनी या मुद्द्यावर पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी भारताचा उल्लेख करत पाकिस्तानला सुनावले आहे. त्यांनी म्हटले की, “पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अंतर्गत अस्थिरता इतकी वाईट आहे की तो वाखान कॉरिडॉरवर कब्जा करण्याची किंवा नवीन युद्ध पुकारण्याची क्षमता ठेवत नाही.” त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी पराभवांचा इतिहासदेखील उलगडला. 1971 मध्ये भारतासोबत झालेल्या युद्धात पाकिस्तानला मोठा पराभव सहन करावा लागला.
त्यावेळी पूर्व पाकिस्तान (आताचे बांगलादेश) गमावून बसले आणि 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले, जो आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा आत्मसमर्पण मानला जातो. तालिबानच्या उप-परराष्ट्र मंत्र्यांनी 1973 आणि 1989 च्या जलालाबाद युद्धाचा उल्लेख करत पाकिस्तानला त्याच्या अपयशाची जाणीव करून दिली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या लष्कराला परदेशात कधीही मोठे यश मिळालेले नाही. त्यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांवरही टीका केली आणि बलुच आणि पश्तून समुदायावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधले.
घुसखोरी करुन मोठी चूक कराल
पाकिस्तानच्या वाखान कॉरिडॉरवरील इच्छेबाबत त्यांनी म्हटले की, “ही कल्पना मूर्खपणाची आहे. अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी करण्याचा किंवा कोणताही भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करणे पाकिस्तानसाठी मोठी चूक ठरेल.” यापूर्वी शहबाज शरीफ यांनी देशातील राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांनी देशातील वाढत्या सुरक्षा संकटावर मात करण्यासाठी सामंजस्याने काम करण्याची गरज व्यक्त केली होती. परंतु, तालिबानने दिलेली ही चेतावणी पाकिस्तानसाठी मोठे आव्हान ठरू शकते.