फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये काल (4 जानेवारी 2025) मोठा आत्मघाती हल्ला झाला असल्याची माहिती मिळाली आहे. न्यू बहमन परिसरात कराचीहून तुबर्तकडे जाणाऱ्या एका बसला लक्ष्य करण्यात आले. या स्फोटामनुळे बस जळून पूर्ण खाक झाली. यामध्ये पाकिस्तानच्या 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मोठ्या संख्येने जवानांचा समावेश आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली हल्ल्याची जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. बुलिस्तानच्या पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीहून कराचीहून तुर्बतकडे जाणारी बस न्यू बहमन भागात स्फोटामुळे उद्ध्वस्त झाली. स्फोटानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बल आणि पोलीस तैनात करण्यात आले असून संपूर्ण परिसरात तातडीने बंदोबस्त करण्यात आला आहे.
क्वेटा SSP कुटुंब देखील स्फोटात अडकले
क्वेटा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) जोहैब मोहसिन हे स्वतः आपल्या कुटुंबासह तुर्बतकडे प्रवास करत असताना या स्फोटात अडकले. या घटनेत जोहैब मोहसिन आणि त्यांचे चार कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने स्थानिक प्रशासन हादरले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री मीर सरफराज बुगतींचा निषेध
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या भयानक हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करताना म्हटले आहे की, “निर्दोष लोकांना लक्ष्य करणारे लोक मानवतेचे शत्रू आहेत. ते माणूस म्हणवून घेण्याच्या लायक नाहीत.” त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली असून जखमींच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली.
घटनास्थळावर तपास सुरू
हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. स्फोटामागील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. बलुचिस्तान सरकारने या हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. हा हल्ला पाकिस्तानमधील वाढत्या अस्थिरतेचे प्रतीक असून, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.