राणी एलिथाबेथ २ (Queen Elizabeth) यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स (Prince Charles ) हे ब्रिटनचे राजे म्हणून आज शनिवारी पदग्रहण करणार आहेत. प्रिन्स चार्ल्स हे राजे चार्ल्स तिसरे (King Charles-III) म्हणून ओळखले जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केले जाणार आहे.
प्रिन्स चार्ल्स हे लंडनमध्ये (London) दाखल झाले असून शनिवारी त्यांची अधिकृतरित्या महाराजा म्हणून नियुक्ती होणार आहे. त्याचबरोबर पत्नी कॅमिला यांच्या डोक्यावरही कोहिनूर हिरा जडलेल्या मुकूट परिधान केला जाणार आहे. शनिवारी १० सप्टेंबर रोजी सेंट जेम्स पॅलेस येथे अॅक्सेसेशन कौन्सिलच्या बैठकीत किंग चार्ल्स यांची अधिकृतपणे ब्रिटनचे नवीन सम्राट म्हणून घोषणा केली जाणार आहे. आज होणाऱ्या पदग्रहण कार्यक्रमात सुमारे ७०० पाहुणे सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठ खासदारांचा एक गट, काही अधिकारी, राष्ट्रकुल देशातील उच्चायुक्त आणि लंडनचे लॉर्ड महापौर सहभागी होतील. कमी वेळेत पदग्रहण सोहळा आयोजित झाल्याने अनेक पाहुणे या कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल.
लंडनमध्ये पोहोचल्यानंतर किंग चार्ल्स पहिल्यांदा ब्रिटनच्या जनतेला संबोधित करणार आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर त्याचं भाषण आधारित असेल. ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ महाराणीपद भूषणवलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांना नागरिकांनी त्यांच्या पॅलेसबाहेर फुलांचे गुच्छ ठेवत श्रद्धांजली अर्पण केली. सध्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळं संपूर्ण ब्रिटन सध्या शोक सागरात बुडाला आहे. ब्रिटनमध्ये आजपासून १० दिवसांसाठी राजकीय शोक पाळला जाणार आहे.