गुहागर किनाऱ्यावर शुकशुकाट; नेहमी गर्दीने गजबजलेला समुद्रकिनारा पडला ओस
गुहागर : दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असल्याने गुहागर तालुक्यातील पर्यटनावर परिणाम झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नेहमी गर्दीने गजबजलेला समुद्रकिनारा सध्या ओस पडला असून, पर्यटकांची वर्दळ प्रामुख्याने शनिवार-रविवारपुरती मर्यादित राहिल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पर्यटन हंगामाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर इतर हंगामात अधिक बहरून येते. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरतात. शाळा व महाविद्यालयाच्या परिक्षा संपल्यानंतर पर्यटक दरवर्षी गुहागरात मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला हजारो पर्यटक येत असतात. गुहागर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या लक्षणीय असते.
प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटनस्थळे
निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतात. मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर शाळ महाविद्यालयाच्या सुट्ट्या पडली कि अनेक पर्यटक आपल्या मुलांसह गुहागरकडे धाव घेतात.
सोयी-सुविधांमुळे सलग तीन दिवस वास्तव्य
पूर्वी गृहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक आता सलग तीन दिवस वास्तव्य करुन असतो. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून अती गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. येथील पर्यटन सोयी सुविधांमुळे हे शक्य झाले आहे.
दहावी परीक्षेसाठी राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांची नोंदणी
सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी बोर्ड परीक्षा शुक्रवारपासून (दि.20) सुरू झाली आहे. राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८७९ ने जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळल्यानंतर, राज्य मंडळासमोर यावर्षी दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे आव्हान आहे.
हेदेखील वाचा : 10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद






